Chitra Wagh’s reaction to Dhananjay Munde’s resignation
धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला. देवाभाऊंच्या नेतृत्वात चुकीला माफी नाही…, असे भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
(Chitra Wagh) मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून गेले तीन महिने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणावरून सर्वपक्षीय निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने आरोपपत्राबरोबर दाखल केलेल्या फोटोंवरून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज, मंगळवारी अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सदसद्-विवेक बुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि, भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी, याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत, ‘चुकीला माफी नाही,’ असे म्हटले आहे. (Chitra Wagh’s reaction to Dhananjay Munde’s resignation)
संतोष देशमुख हत्याप्रकरणात परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. म्हणूनच विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली होती. या हत्येप्रकरणी सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना सोबत काही फोटोही जोडले आहेत. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरतेने हत्या केली ते या फोटोद्वारे समोर आले आणि तत्काळ राजकीय हालचालींना वेग आला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विरोधक आक्रमक होतील, हे स्पष्ट असल्याने सोमवारी रात्रीच मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वीकारला.
देवाभाऊंच्या नेतृत्वात चुकीला माफी नाही…@Dev_Fadnavis @CMOMaharashtra https://t.co/ss5AUFvlbN
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 4, 2025
त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज, मंगळवारी सकाळी अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. माझ्या सदसद्-विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत स्पष्ट केले आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला असल्याचे म्हटले आहे. आता भाजपा आमदार चित्रा वाघ यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अजित पवार यांचा सूर लावला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला. देवाभाऊंच्या नेतृत्वात चुकीला माफी नाही…, असे त्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी धनंजय मुंडे यांचाही संबंध आहे, असे चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले असल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – Dhananjay Munde : अजित पवारांचे वक्तव्य आणि धनंजय मुंडेंच्या ट्वीटमध्ये तफावत; राजीनामा नेमका कशामुळे
Comments are closed.