हिंसाचाराऐवजी शांततेचा मार्ग निवडा!

मणिपूरवासियांना पंतप्रधानांचे आवाहन : दोन वर्षांपासूनच्या हिंसाचारानंतर पंतप्रधानांचा मणिपूर दौरा

वृत्तसंस्था/ इंफाळ/चुराचंदपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर पोहोचले. मे 2023 मध्ये राज्यात हिंसाचार उसळल्यापासूनचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधानांनी इंफाळ आणि चुराचंदपूरमध्ये 8,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. त्यानंतर इंफाळमधील कार्यक्रमाला उपस्थिती लावत पंतप्रधानांनी राज्यातील लोकांना संबोधित केले. मणिपूरला हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आहे. येथे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार दुर्दैवी आहे. हा हिंसाचार आपल्या पूर्वजांवर आणि आपल्या भावी पिढ्यांवर मोठा अन्याय आहे. आपल्याला मणिपूरला शांतता आणि विकासाच्या मार्गावर घेऊन जायचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान शनिवारी सकाळी मिझोरमहून मणिपूरला पोहोचले. ते इंफाळ विमानतळावर उतरले. तेथून ते रस्त्याने कुकीबहुल जिल्हा चुराचंदपूरला गेले. पंतप्रधानांनी हिंसाचाराच्या काळात हिंसाचाराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या चुराचंदपूर जिह्यात रोड शो आणि जाहीर सभा घेतली. याप्रसंगी ‘मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गावर पुढे जाण्याचे आवाहन करतो. मी तुमच्यासोबत असल्याचे वचन देण्यासाठी आज इथे पोहोचलो आहे,’ असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी इंफाळमध्ये 1,200 कोटी आणि चुराचंदपूरमध्ये 7,300 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. ते चुराचंदपूरमधील मदत शिबिरात हिंसाचारग्रस्तांना भेटण्यासाठी गेले. इंफाळमधील कार्यक्रमस्थळी त्यांनी हिंसाचारग्रस्तांशी मनमोकळा संवाद साधला.

मणिपूरच्या लोकांशिवाय भारतातील व्यवहार अपूर्ण

मणिपूरमधील अनेक मुले देशाच्या विविध भागात माँ भारतीचे रक्षण करण्यात गुंतलेली आहेत. अलीकडेच, ऑपरेशन सिंदूरमध्ये जगाने भारताच्या सैन्याच्या ताकदीची कबुली दिली. आपल्या सैन्याने कहर केल्यानंतर पाकिस्तान मदतीसाठी ओरडू लागले. यामध्ये मणिपूरचेही मोठे योगदान आहे. मी 2014 मध्ये म्हटले होते की मणिपूरच्या संस्कृतीशिवाय भारताची संस्कृती अपूर्ण आहे आणि भारताचे खेळ त्याच्या खेळाडूंशिवाय अपूर्ण आहेत. मणिपूरचे तरुण तिरंग्याच्या अभिमानासाठी तन, मन आणि धनाने समर्पित आहेत, असे मोदी म्हणाले.

विकसित भारतातील शहरांमध्ये इंफाळ

21 व्या शतकाचा हा काळ ईशान्येकडील आहे. म्हणूनच भारत सरकारने मणिपूरच्या विकासाला सतत प्राधान्य दिले आहे. याचा परिणाम म्हणून मणिपूरचा विकासदर सतत वाढत आहे. 2014 पूर्वी मणिपूरचा विकास दर एक टक्क्यांपेक्षा कमी होता. आता, मणिपूर पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वेगाने प्रगती करत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जाहीर केले.

मणिपूरमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा एक नवीन टप्पा सुरू झाला आहे. रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा वेग अनेक पटींनी वाढल्याचा मला आनंद आहे. येथील प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहोचवण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. इंफाळ हे उमलते शहर आहे. मी हे शहर विकसित भारतातील अशा शहरांपैकी एक म्हणून पाहतो, जे आपल्या तरुणांची स्वप्ने पूर्ण करेल. या शहराच्या प्रगतीमुळे देशाच्या विकासाला गती मिळेल, असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंफाळमधील वांशिक हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांशी संवाद साधला. इंफाळमधील ऐतिहासिक कांगला किल्ला संकुलात विस्थापित लोकांच्या कुटुंबांच्या भावना ऐकल्यानंतर राज्यात शांतता आणि सामान्यता पुनर्संचयित करण्यासाठी केंद्राच्या वचनबद्धतेची त्यांना खात्री दिली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी चुराचंदपूरमधील शांतता मैदानावर अंतर्गत विस्थापित लोकांशी संवाद साधला. या भेटीबाबत बोलताना ‘काही वेळापूर्वी, मी एका मदत शिबिरात बाधित लोकांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतर मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की मणिपूरमध्ये आशा आणि श्रद्धेची एक नवीन पहाट उगवत आहे,’ असे मोदी चुराचंदपूरमध्ये म्हणाले.

काँग्रेस-एमपीपी युवा मोर्चाचे आंदोलन

इंफाळमध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळाजवळ काँग्रेस आणि मणिपूर पीपल्स पार्टी (एमपीपी) युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पंतप्रधानांच्या दौऱ्याला युवकांनी विरोध करत त्याला राजकीय डावपेच म्हटले. मणिपूर पीपल्स पार्टी युथ फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा उद्देश राज्यात शांतता आणि सामान्यता पुनर्संचयित करणे हा नसल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर काँग्रेस भवनासमोर काँग्रेस युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही असाच निषेध केला. पोलिसांनी निदर्शकांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळाकडे जाण्यापासून रोखले.

‘शांततेचा मार्ग स्वीकारा, मी तुमच्यासोबत आहे’

मी मणिपूरच्या सर्व संघटनांना शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतो. तुमच्या मुलांचे भविष्य सुनिश्चित करा. मी वचन देतो की मी तुमच्यासोबत आहे. भारत सरकारही तुमच्यासोबत म्हणजेच मणिपूरच्या लोकांसोबत आहे. येथील लोकांचे जीवन पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Comments are closed.