वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातून ख्रिश्चन मिशेलची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली :

मनमोहनसिंग सरकारच्या काळात गाजलेल्या आगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील एक आरोपी आणि मध्यस्थ ख्रिश्चन मिचेल जेम्स याची दिल्लीतील रोझ अॅव्हेन्यू न्यायालयाने सुटका केली आहे. मनी लाँडरींग प्रकरणात त्याला ईडीकडून अटक करण्यात आली होती. हे मनी लाँडरिंग प्रकरण आगुस्ता वेस्टलँड प्रकरणाशी संबंधित आहे. आपला जास्तीत जास्त सात वर्षांचा कायदेशीर शिक्षा कालावधी पूर्ण झाल्याने आपल्याला कारागृहातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज त्याने सादर केला होता. तो मान्य करण्यात आला आहे. तथापि, त्याची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता नाही. कारण याच   प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तो सीबीआयच्या कोठडीत आहे.  त्याने सीबीआय कोठडीतूनही आपली सुटका व्हावी, अशी मागणी करणारा अर्ज सादर केला आहे. या अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही. त्याला काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय प्रकरणात जामीन संमत केला होता. तर दिल्ली उच्च न्यायालायने त्याला मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन संमत केला होता.  दिल्ली न्यायालयाच्या या निर्णयावर मिचेल जेम्स याने समाधान व्यक्त केले. भारतात काही चांगले न्यायाधीश आहेत. मी भाग्यवान ठरलो आहे, अशा शब्दांमध्ये त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली असून सीबीआय प्रकरणात त्याचा अर्ज संमत झाल्यास त्याची पूर्णत: सुटका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.