अमेरिकेच्या CIA आणि ODNI या गुप्तचर संस्थांच्या ओपन-सोर्स सिस्टीम नेटवर्कवर सायबर अटॅक
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या सुरक्षिततेला पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा धक्का बसला आहे. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) आणि ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (ODNI) येथे सायबर सुरक्षा उल्लंघनाच्या घटना उघड झाल्या असून, या हल्ल्यात काही अवर्गीकृत माहिती बाहेर आल्याचे समोर आले आहे.
सार्वजनिक आणि अवर्गीकृत माहितीच्या आधारे गुप्त माहिती संकलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ओपन-सोर्स इंटेलिजन्स सिस्टीम’ या नेटवर्कला या घुसखोरीचा फटका बसल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. नेमकी कोणती अवर्गीकृत माहिती लीक झाली, याबाबत अहवालात स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र, या गळतीमुळे इतर सरकारी संस्थांच्या माहितीवरही परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराबाबत ओडीएनआयने स्पष्टीकरण देताना सांगितले की, कोणत्याही महत्त्वपूर्ण क्षमता किंवा वर्गीकृत प्रणालींमध्ये व्यत्यय आलेला नाही. दुसरीकडे, सीआयएने या प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
अलिकडच्या काळात अमेरिकेतील विविध सरकारी विभागांवर होत असलेल्या सायबर हल्ल्यांच्या मालिकेचाच हा एक भाग मानला जात आहे. यापूर्वी कृषी विभाग, एफबीआय, पेंटागॉन आणि गृह सुरक्षा विभागाशी संबंधित सायबर घटना समोर आल्या आहेत. हा सायबर हल्ला नेमका कसा झाला आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास अद्याप स्पष्ट झालेला नाही.
Comments are closed.