गायक हंसराज रघुवंशी यांना जिवे मारण्याच्या धमक्या, खंडणीची मागणी

गायक हंसराज रघुवंशी यांना धमकी मिळाली होती

प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांना जीवे मारण्याची धमकी आणि १५ लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. हंसराज रघुवंशी यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक कटारिया यांच्या तक्रारीवरून जिरकपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील राहुल कुमार नागडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, राहुलची हंसराज रघुवंशीसोबत पहिली भेट २०२१-२२ मध्ये उज्जैन येथील श्री महाकाल मंदिरात झाली होती. तो गायकाचा चाहता बनला आणि त्याच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. हळूहळू, तो गायकाच्या वैयक्तिक आयुष्यात घुसू लागला. एवढेच नाही तर त्याने हंसराज रघुवंशी यांच्या नावाने एक इन्स्टाग्राम अकाउंटही बनवले आणि स्वत:ला आपला लहान भाऊ म्हणवून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर, त्याने 2023 मध्ये गायकाच्या लग्नाला आमंत्रण न देता हजेरी लावली आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल नंबर देखील घेतले.

खंडणी मागण्या आणि धमक्या

राहुल नागडे आता गायकाची पत्नी, आई आणि टीमच्या सदस्यांना फोन आणि व्हॉट्सॲप कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. स्वत:ला लॉरेन्स बिश्नोईचा गुंड असल्याचे सांगून त्याने गोल्डी ब्रार टोळीशी संबंध असल्याचा दावा केला आहे. राहुलने १५ लाखांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. जिरकपूर पोलिसांनी राहुलकुमार नागडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोपी गायकाच्या लोकप्रियतेचा पद्धतशीरपणे फायदा घेत होता आणि आता त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बनावट ओळखीसह फसवणूक

राहुल गायकाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत त्याच्या चाहत्यांकडून पैसे आणि भेटवस्तू घेतात, असेही तक्रारीत म्हटले आहे. तो लोकांशी संपर्क साधतो आणि हंसराजचा लहान भाऊ असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करतो. हंसराजला अशा तक्रारी आल्यावर त्याने मे 2025 मध्ये राहुलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. यानंतर संतापलेल्या राहुलने गायक आणि त्याच्या कुटुंबाला धमक्या देण्यास सुरुवात केली.

Comments are closed.