सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनच्या लग्नाची घोषणा केली, पंतप्रधान मोदींना आमंत्रण

सचिन तेंडुलकरच्या मुलाच्या लग्नाची आनंदाची बातमी

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या लग्नाची घोषणा केली आहे. अर्जुनच्या भावी पत्नीचे नाव सानिया आहे. अलीकडेच सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सचिनने पीएम मोदींना अर्जुन आणि सानियाच्या लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले. या भेटीत सचिनच्या कुटुंबीयांनी पीएम मोदींसोबत फोटोही काढले. या भेटीबद्दल सचिन तेंडुलकरचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

पंतप्रधान मोदींना लग्नाचं आमंत्रण

सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “आम्हाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचे निमंत्रण देण्याचे सौभाग्य मिळाले. या तरुण जोडप्याला तुमचे आशीर्वाद आणि चांगल्या सल्ल्याबद्दल मोदीजी तुमचे आभार.”

सोनिया गांधी यांचीही भेट घेतली

सचिन तेंडुलकरने मंगळवारी दिल्लीत काँग्रेस खासदार आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी १०, जनपथ येथे भेट घेतली. यावेळी त्यांची पत्नी अंजली तेंडुलकरही त्यांच्यासोबत होती. रिपोर्ट्सनुसार, या लग्नात सोनिया गांधींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

Comments are closed.