सिडकोच्या कार्मिक विभागाचा कारनामा, सहाय्यक विकास अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीऐवजी सरळसेवेने भरण्याचा घाट

सिडकोमध्ये सहाय्यक विकास अधिकारी पदाची भरती पदोन्नतीने करण्याचा ठराव संचालक मंडळाने केला आहे. मात्र या नियमाला बगल देत याच पदांची भरती सरळसेवा पद्धतीने करण्याचा घाट सिडकोच्या कार्मिक विभागाने घातला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडणार आहे.

सिडकोमध्ये सहाय्यक विकास अधिकाऱ्यांची 47 पदे आहेत. त्यापैकी 24 रिक्त पदे भरण्यासाठी सिडकोच्या कार्मिक विभागाने सक्षम कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याऐवजी सरळसेवा भरती करण्यासाठी जाहिरात काढली आहे. या जाहिरातीमध्ये व्हीजीएनटीसाठी दोन पदे, ईडब्ल्यूएससाठी 2, बीसीसाठी 2, ओबीसीसाठी 7 आणि खुल्या प्रवर्गासाठी 11 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण पदांचा विचार करता आरक्षित प्रवर्गांसाठी देण्यात आलेल्या जागा कमी आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेला सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया आणि जाहिरात तातडीने रद्द करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नितीन कांबळे आणि सरचिटणीस योगेश ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.

लक्ष्मीदर्शनासाठी खटाटोप
सिडकोला भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखले जाते. या महामंडळात प्रतिनियुक्तीवर येण्यासाठी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना एक खोका द्यावा लागतो. अंतर्गत बदल्यांसाठीही मोठे अंडरटेबल व्यवहार होत आहेत. लक्ष्मीदर्शनासाठीच सहाय्यक विकास अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीऐवजी सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Comments are closed.