ही फक्त सुरुवात… ज्ञानेश कुमार जाईपर्यंत आंदोलन सुरूच राहील! सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांचा इशारा
आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन थांबेल, असे मोदी सरकारला वाटत असेल. मात्र तुम्ही कितीही लोकांना ताब्यात घ्या, हे आंदोलन थांबणार नाही. ही तर आंदोलनाची नवी सुरुवात असून जोपर्यंत मत चोरी करणारे ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) अजिंक्य शिंदे यांनी दिला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
दिल्लीत जंतर मंतर येथे सीजेपीने आंदोलनाची हाक दिली होती. मात्र त्यापूर्वीच सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांची मुस्कटदाबी केली. यावरून शिंदे म्हणाले, गेल्या वेळी जंतर मंतर येथे हुकूमशाही मोदी सरकारचे गर्वहरण झाले होते. त्यामुळे आता सरकार घाबरले आहे. पुन्हा दिल्लीत आंदोलन नको म्हणून बस, रेल्वे रोखल्या. लोकांना बस आणि रेल्वेतून बाहेर काढून ताब्यात घेतले. हवा आणि पाणी सोडून सरकारने सर्वकाही रोखले आहे. पण आम्ही तुमच्या हुकूमशाहीला घाबरणार नाही. हुकूमशाही सरकार जनतेला घाबरले आहे. सरकारला वाटत असेल की, आंदोलन आजच संपेल, पण ही तर आंदोलनाची नवी सुरुवात आहे. कितीही लोकांना ताब्यात घेतले तरी मतचोरी करणारे ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. हा लढा दीर्घकाळ चालणार आहे, असे शिंदे म्हणाले.
अभिजित यांच्या आजीचे निधन झाले, मात्र पोलिसांनी अभिजित यांचे वकील किंवा कुटुंबीयांशी त्यांना बोलू दिलेले नाही. उलट पोलीस त्यांच्यावर भावनिक अत्याचार करत आहेत. पोलिसांकडून भावनिक छळ केला जात आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.
लोकांनी आता विमानाने प्रवास करू नये च्या?
लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तर त्यांना ताब्यात घेतलेले समजू शकतो. पण आता तुम्ही विमानातूनच लोकांना ताब्यात घेऊ लागले. त्यामुळे लोकांनी विमानातून प्रवास करणे सोडून द्यावे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अभिजित, सौरभ आणि आशुतोष यांना कुठे नेण्यात आले आहे, हे आम्हाला किंवा त्यांच्या वकिलांनाही समजू शकलेले नाही. त्यांच्या सुरक्षेबाबत आम्ही चिंतीत आहोत, असे शिंदे म्हणाले.
Comments are closed.