वर्षभर शांतता भंग न करण्याच्या अटीवर अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका; आंदोलनाबाबत उत्सुकता – TMarathiNews
नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुमारे २४ तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. वर्षभर शांतता भंग न करण्याच्या अटीवर न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याची माहिती समोर आली आहे. सुटकेनंतर पक्षाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या तिघांची संयुक्त पत्रकार परिषद दुपारी २ वाजता होणार असल्याचे आशुतोष रांका यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन करण्याच्या तयारीत असताना या तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विमानाने मुंबईहून दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
सीजीपीने सोशल मीडियावरील पोस्टमधून आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली होती. पक्षाच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत जंतरमंतरवर पुन्हा मोर्चा काढून आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे पक्षाने म्हटले होते. निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्याशिवाय घरी परतणार नसल्याचा निर्धार पक्षाचे नेते अजिंक्य शिंदे यांनी व्यक्त केला होता.
मात्र, नेत्यांच्या सुटकेनंतर आंदोलन नियोजित पद्धतीने पुढे सुरू राहणार की त्यात काही बदल होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याची माहितीही समोर आली असून, ते अंत्यसंस्कारासाठी गावी जाणार का, याबाबत उत्सुकता आहे.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान अनेकांना ताब्यात
निवडणूक आयोगाविरोधातील निदर्शनांमुळे शनिवारी दिल्लीतील अनेक भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, पिनराई विजयन, नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह विविध राजकीय नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत राजधानीत सुमारे सहा हजार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती. जंतरमंतर परिसरात आंदोलकांना जाण्यापासून रोखण्यात आले होते.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक, नागरी समाजातील सदस्य, वकील आणि पत्रकारांना मोठ्या संख्येने ताब्यात घेतल्याच्या वृत्तांबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने चिंता व्यक्त केली होती. या मुद्द्यावर भारताने शनिवारी प्रत्युत्तर दिले. आता सीजेपी नेत्यांच्या सुटकेनंतर आंदोलनाची पुढील रणनीती काय असेल आणि पक्ष आपल्या मागण्यांसाठी कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.