पायलटने इंधन स्विच बंद केल्याचा दावा करा
‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्ताचा भारतीय तज्ञांकडून ‘समाचार’
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमान अपघातानंतर ‘बोईंग’ अडचणीत सापडल्याचे पाहून अमेरिकेने संपूर्ण प्रकरणाला नवीन रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अहमदाबाद अपघातानंतर विश्वासार्हता गमावलेल्या बोईंगची नाचक्की रोखण्यासाठी अमेरिकन मीडियाने भारतीय पायलटला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) आणि अमेरिकन अधिकाऱ्यांच्या अहवालाचा हवाला देत अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने कॉकपिट रेकॉर्डिंगचा हवाला देत सुमित सभरवालने स्वत: विमानाच्या इंजिनांना इंधन पुरवठा बंद केला होता, असे म्हटले आहे.
मात्र, भारतातील काही विमान वाहतूक तज्ञांनी याबाबत आक्षेप घेत भारतापेक्षा अमेरिकेतील माध्यमांकडेच अधिक तपशील असल्याचा आरोप करत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्ताचा ‘समाचार’ घेतला. भारतीय एजन्सींनी मात्र यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. वॉल स्ट्रीट जर्नलने विमान दुर्घटनेनंतरच्या तपास अहवालासंबंधीचे वृत्त प्रसारित केले आहे. पायलटमधील संवादामध्ये प्रश्न विचारताना सह-वैमानिक आश्चर्यचकित झाला. त्याच्या आवाजात भीती होती, तर कॅप्टन सुमित शांत दिसत होता, असे सदर वृत्तात म्हणत अपघातासाठी पायलटलाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकन मीडियाच्या या दाव्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांचा हवाला दिला आहे.
त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त माहिती कशी? : तज्ञ
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानंतर विमान वाहतूक तज्ञ संजय लाझर यांनी चौकशी अहवाल लीक झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, भारतीय संसद आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयापेक्षा अमेरिकन मीडियाला जास्त माहिती असणे आश्चर्यकारक आहे. हा अहवाल भारतातील पूर्ण पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करतो. पंतप्रधानांनी कोणत्याही उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Comments are closed.