आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा एल्गार, 5 व 6 मे रोजी काळय़ा फिती लावून काम करणार

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेली राज्यातील सर्व सिव्हील रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विमा योजना रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांसाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही या मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे 5 आणि 6 मे रोजी काळ्य़ा फिती लावून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. दरम्यान, 7 मे रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे.
रुग्णालये आणि विभागातील वर्ग ड ची सर्व रिक्त पदे सरळसेवेने तत्काळ भरून सध्या सुरू असलेले खासगीकरण आणि कंत्राटीकरण धोरण रद्द करावे. मनोरुग्णालयातील निरसित केलेली वर्ग- 4 ची पदे पुनर्जिवित करावीत. राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत गट ड पदांसाठी तत्काळ नवीन सेवाप्रवेश नियम तयार करावेत. 14 एप्रिल 1981 च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त गट ड कर्मचाऱ्यांना 18 हजार रुपये किमान वेतन मिळावे अशा अनेक मागण्या राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस बाबाराव कदम, मनोहर दिवेकर, तसेच राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भगवान शिंदे, सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर, उपाध्यक्ष विजय सुरवसे यांनी द्वारसभा घेतल्या.
Comments are closed.