तिसऱ्या पत्नीसाठी टॉवरवर चढणे
मध्यप्रदेश राज्यातील मऊगंज येथे नुकतीच घडलेली ही स्वारस्यपूर्ण घटना आहे. आपल्या पत्नीशी वाद झाल्याने एक युवक येथील मोबाईल टॉवरवर चढला. त्याला खाली उतरविण्यासाठी पोलिसांना बरेच तास प्रयत्न करावे लागले. अखेर चार तासांच्या मिनतवारीनंतर त्याची समजूत पटली आणि तो एकदाचा खाली उतरला. त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत या युवकाच्या संदर्भातील अशा बाबी बाहेर पडल्या, की ज्यांची कल्पना करणे पोलीसांनाही शक्य झाले नाही. या युवकाचे नाव विकास असल्याची माहिती नंतर देण्यात आली. स्वत:ची दोन लग्ने झाली असतानाही त्याने हे लपवून ठेवून आणखी एका युवतीशी विवाह केला.
विकास मुंबईत ट्रक चालक आहे. त्याचे दोन विवाह झालेले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर आणखी एका युवतीशी परिचय वाढविला. तिच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. अखेर दोघे लग्नबंधनात अडकले. त्याच्या या नव्या पत्नीचे नाव काजोल कोल असे आहे. ती विवाहानंतर त्याच्यासह नांदावयास आली. कालांतराने दोघांना एक अपत्यही झाले. पण विवाहानंतर साधारण दोन वर्षांनी, त्याची यापूर्वी दोन लग्ने झाली आहेत, हे तिला समजले. तसेच या दोन पत्नींच्या पासून त्याला सात अपत्ये आहेत, हेही तिला समजले. तिला आश्चर्याचा धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे ती त्याला सोडून आपल्या अपत्यासह माहेरी पुन्हा रहावयास आली. पण पहिल्या दोन पत्नी असूनही त्याला तिच्यावाचून करमत नव्हते. त्यामुळे तो तिला शोधत तिच्या माहेरी पोहचला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तिच्यावर दबाव आणण्यासाठी तो जवळच्या मोबाईल टॉवरवर चढला आणि तेथून खाली उडी टाकण्याची धमकी देऊ लागला. अखेरीस पोलिसांना बोलाविण्यात आल्यानंतर त्यांनी त्याला खाली उतरविले. आता तिसऱ्या पत्नीने विकासच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. तिने त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहेच. शिवाय, त्याला दारु पिण्याचे व्यसन असून तो दारुच्या नशेत मारहाण करतो, असाही आरोप त्याच्यावर केलेला आहे. पोलीस पुढचा तपास करीत आहेत. एकंदर., या तिसऱ्या पत्नीचा मोह त्याला चांगलाच महागात पडला असून तो चांगलाच अडचणीत आल्याचे दिसून येते.
Comments are closed.