IND vs ZIM: भारताचा झिम्बाब्वेवर 72 धावांनी दणदणीत विजय; सेमीफायनलच्या शर्यतीत टीम इंडिया कायम!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर, आज सुपर-8 मध्ये भारताचा सामना झिम्बाब्वेशी झाला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी या निर्णयाचा फायदा घेत 20 षटकांत 4 गडी गमावून 256 धावांचा डोंगराएवढा स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात जिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत 6 बाद 184 धावाच करू शकला आणि भारताने 72 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयामुळे भारताचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न जिवंत आहे.

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियासाठी संजू सॅमसनने 24 धावांची आक्रमक खेळी केली. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावा ठोकत दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशनने 38 धावांची भर घातली, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने अवघ्या 13 चेंडूत 33 धावा केल्या.

आज सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने फक्त 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांनीही प्रत्येकी 4-4 षटकार मारले, ज्यामुळे भारताला 256 धावांपर्यंत मजल मारता आली. झिम्बाब्वेसाठी रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि सिकंदर रझाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

257 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात संथ पण चांगली झाली. यष्टीरक्षक फलंदाज तादिवानाशे मारुमानीने 20 धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर ब्रायन बेनेटने अप्रतिम फलंदाजी करत 59 चेंडूत नाबाद 97 धावांची झुंजार खेळी केली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या दोघांशिवाय कर्णधार सिकंदर रझाने 31 धावांचे योगदान दिले.
मात्र, त्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. परिणामी, झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 184 धावाच करू शकला आणि भारताने 72 धावांनी हा सामना जिंकला. भारतासाठी अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Comments are closed.