जम्मू -काश्मीरमधील ढग, 4 लोक मारले
मंडळ / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टी आणि पूर यांचा कहर झाला आहे. या प्रदेशाच्या दोडा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे अतोनात हानी झाली असून 4 नागरीकांना प्राण गमवावे लागले आहेत. कथुआ आणि किष्तवार येथील मोठ्या प्रमाणात जलवृष्टी झाली. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले असून अनेक भागांचा मुख्य मार्गांशी संपर्क तुटला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
देशाच्या पर्जन्यमान विभागाने सोमवारीच अतिवृष्टी आणि ढगफुटीचा इशारा दिला होता. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी आले. कथुआ आणि किष्तवार प्रमाणेच सांबा, दोडा, जम्मू, रामबन आदी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. दोडा जिल्ह्यात डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात वृष्टी झाल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. अनेक स्थानी दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक मार्ग खचले आहेत. अनेक गावांमधील वीजपुरवठा बंद पडल्याचे वृत्त आहे.
तावी नदीला पूर
दोडा जिल्ह्यातील तावी नदीला महापूर आला असून तिच्या तटावर असलेल्या गावांमध्ये पाणी शिरले. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ रोखण्यात आली होती. दोडा येथील एक महत्वाचा मार्ग वाहून गेल्याने वाहतुकीत खंड पडला. या महामार्गावर दोन स्थानी दरडी कोसळल्या असून त्यांचा ढिगारा हटविण्याचे काम करण्यात येत आहे. तावी नदी दुथडी भरुन वहात असून तिच्यातील पाण्याची पातळी धोक्याच्या रेषेपेक्षा अधिक झाली आहे.
तीन-चार दिवस हीच स्थिती
पर्जन्यमान विभागाच्या म्हणण्यानुसार जम्मू-काश्मीर प्रदेशात आणखी तीन ते चार दिवस पावसाची स्थिती अशाच प्रकारची राहील. नागरीकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. जम्मू विभागाला महापुराचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन साहाय्यता पथकांनी अनेक भागांमध्ये कामाला प्रारंभ केला आहे.
वैष्णदेवी यात्रा दृष्टीकोन
जम्मू भागात अतिवृष्टी झाल्याने सध्या होत असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला अस्थायी स्थगिती देण्यात आली आहे. यात्रेकरुंना आहेत त्याच स्थानी थांबण्याची सूचना करण्यात आली. स्थिती सुधारल्यानंतर एक दोन दिवसांमध्ये ही यात्रा पुन्हा पुढची वाट चालू लागेल, अशी शक्यता आहे. या यात्रेला भारतभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या सुविधांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
आणखी ढगफुटी होणार
या प्रदेशात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये आणखी ढगफुटीसारखे प्रकार घडतील, असा इशारा पर्जन्यमान विभागाने दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली. तर जम्मू भागातील चार जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून काही स्थानी ढगफुटी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महापुराची शक्यताही व्यक्त करण्यात आली. प्रदेशातील बहुतेक शाळांना सुट्या घोषित करण्यात आल्या आहेत.
Comments are closed.