किशतवार मधील क्लाउडबर्स्ट; 38 लोक मारले
120 हून अधिक जखमी : 200 हून अधिक बेपत्ता : मृतांचा आकडा वाढण्याची भीती,पहलगामच्या दोन भागातही पूरस्थिती,गंदरबल विभागातही ढगफुटीची घटना,मृतांमध्ये दोन जवानांचाही समावेश,घर-संसार, वाहने चिखलात अडकली
मंडळ/श्रीनगर
गेल्या आठवड्यात उत्तराखंडमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच गुरुवारी जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील चाशोटी भागात ढगफुटीने हाहाकार माजवला. किश्तवाडमधील माचैल माता मंदिराजवळ गुरुवारी मोठी आपत्ती घडली. ढगफुटीमुळे 38 जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत 100 हून अधिक जणांना वाचवण्यात आले आहे. तसेच 200 हून अधिक लोक बेपत्ता किंवा विविध भागात अडकलेले असून त्यांच्या मदत व बचावासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसात अनेक दुकान आणि इमारती उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच या घटनेत अनेक लोकांच्या घरांनाही फटका बसला आहे. अनेकांचे घर-दार, संसार, हॉटेल्स, इमारती तसेच वाहने असे सर्व काही चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले आहे. या आपत्तीशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होत असून त्यामध्ये हृदयद्रावक दृश्य दिसून येत आहे. ढगफुटीच्या दुर्घटनेत सायंकाळी 4 वाजेपर्यंत मृतांचा आकडा 20 वर पोहोचल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर 6 वाजेपर्यंत 38 मृतदेह हाती लागल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांमध्ये दोन सीआरपीएफ जवानांचा समावेश असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
किश्तवाड व्यतिरिक्त गंदरबलमध्येही ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे. किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली तेव्हा माचैल माता मंदिरात भाविकांची गर्दी होती. पहलगामध्येही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी उपस्थित असून बाधितांना सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी प्रशासन, पोलीस, सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला मदत व बचाव कार्य वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत.
ढगफुटी झालेला परिसर माचैल माता यात्रेचा प्रारंभ बिंदू आहे. तिथे मुसळधार पावसानंतर अचानक पूर आला. या पुरात अनेक तात्पुरती दुकाने आणि वाहने वाहून गेली. हिमालयात असलेल्या माता चंडी मंदिराच्या यात्रेदरम्यान चिशोटी परिसरात गुरुवारी दुपारी ढगफुटीची दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली. त्यानंतर विशेष मोहीम सुरू करण्यात आली.
केंद्र सरकारचे बचाव मोहिमेवर लक्ष
या घटनेनंतर केंद्र सरकार काश्मीरमधील प्रशासनाच्या संपर्कात राहून संपूर्ण मोहिमेला हातभार लावत आहे. चिशोटी येथील घटनेमुळे बरीच जीवितहानी होऊ शकते, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. प्रशासन तात्काळ कारवाईत उतरले असून बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपराज्यपालांसोबतच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. एनडीआरएफ पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे शाह यांनी सांगितले.
श्री माचैल यात्रा लांबणीवर
बचावकार्यासाठी जम्मू काश्मीरसह बाहेरून संसाधने एकत्रित केली जात आहेत. सध्या श्री माचैल यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. डझनभर पथके मदत आणि बचावकार्यात गुंतलेली आहेत, परंतु खडकाळ भूभाग आणि सतत पाऊस यामुळे मोहीम आव्हानात्मक बनत असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितली. स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘किश्तवाडमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्व लोकांप्रति माझ्या संवेदना. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल.’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. पंतप्रधान मोदींच्या संदेशानंतर केंद्र आणि राज्य प्रशासनाने मदतकार्याला आणखी गती दिली आहे.
Comments are closed.