टाटा ग्रुपवर संकटाचे ढग वाढत आहेत?
केंद्र सरकारने स्थिती सावरण्याची केली सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठा असणाऱ्या टाटा उद्योसमूहावर संकटाचे ढग आले आहेत काय असा प्रश्न विचारला जात आहे. या संपूर्ण उद्योसमूहाचे नियंत्रण करणाऱ्या ‘टाटा सन्स’ या होल्डिंग कंपनीत मतभेद उफाळून आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही या परिस्थितीची नोंद घेत, स्थिती सावरण्याची सूचना या होल्डिंग कंपनीला केली आहे, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
टाटा उद्योगसमूहाच्या अनेक विश्वस्त संस्था (ट्रस्टस्) आहेत. या संस्थांमध्ये सध्या वादंग होत आहे. हे वादंग अधिकारपदावरुन आणि धोरणांवरुन होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काही वृत्तसंस्थांनी या संबंधातील सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. हा वाद टाटा ट्रस्टस् आणि टाटा सन्स यांच्यातील असल्याचे समजते. टाटा सन्सची सूत्रे सध्या नोएल टाटा यांच्याकडे आहेत. तथापि, त्यांचे अधिकार कमी करण्याच्या हालचाली होत आहेत. टाटा ट्रस्टस् स्वत:कडे निर्णय घेण्याचे अधिकार खेचण्याचा प्रयत्न करीत आहे, अशीही चर्चा उद्योग जगात आहे. त्यामुळे केंद्र सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला आहे.
केंद्र सरकारचा इशारा
टाटा समूहाच्या अंतर्गत स्थितीसंबंधात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. टाटा समूहाने त्वरित आपली अंतर्गत स्थिती सावरावी, असा स्पष्ट इशारा या समूहाला देण्यात आला आहे. टाटा सन्स या सर्वाधिकारी होल्डिंग कंपनीवर वरचढ होण्याचा प्रयत्न टाटा स्टस्टस्कडून केला जाणे, हे उद्योगसमूहाच्या हितासाठी योग्य नाही, असे या समूहाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंध
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टाटा समूहाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. टाटा ट्रस्टस् आणि टाटा सन्स यांच्यातील वाद लवकरात लवकर संपवावा, अशी सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या नेतृत्वाने निर्णायक पावले उचलावीत, यासाठी केंद्र सरकार नेतृत्वाला प्रोत्साहन देत आहे. कोणताही ट्रस्टी किंवा विश्वस्त उद्योग समूहात अस्थिरता निर्माण करत असेल, तर त्याला काढून टाकण्यासाठी पावले उचलली जावीत, असे केंद्र सरकारकडून सुचविण्यात आले आहे. टाटा समूहाच्या हिताशी देशाच्या अर्थव्यवस्थेचे हित जोडले गेले आहे. तसेच देशाच्या अनेक सार्वजनिक बँकांचा पैसाही या समूहात गुंतविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाद संपविणे आवश्यक आहे, याची जाणीव पदाधिकाऱ्यांना करुन देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
शापूरची पालोनजी गटाचा संबंध
टाटा सन्स या सर्वाधिकारी होल्डिंग कंपनीत शापूरजी पालोनजी गटाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक समभाग आहेत. हा गट सध्या रोख रकमेच्या समस्येशी दोन हात करीत आहे. टाटा सन्स आणि शापूरजी पालोनजी या बिगर बँकिंग वित्तसंस्थाही आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही या प्रकरणात लक्ष घातले आहे. एकंदरीत, वाद मिटविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
रतन टाटा यांच्या निधनानंतर…
टाटा सन्सच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ राहिलेले आणि टाटा उद्योगसमूहाला भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह म्हणून परिचय मिळवून देणारे रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 या दिवशी निधन झाले होते. त्यानंतर, टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टस् यांच्यात वाद उफाळल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर टाटा समूहाचे चार ज्येष्ठ प्रतिनिधी आता मुंबईला परतले असून रतन टाटा यांचा प्रथम स्मृती कार्यक्रम झाल्यानंतर हालचालींना वेग येणार आहे.
टाटा समूहातील वादावर प्रयत्न
ड टाटा समूहातील वाद लवकरात लवकर सोडविण्यासाठी केंद्राचेही साहाय्य
ड समूह अस्थिर करणाऱ्या विश्वस्तांना काढून टाकण्याची केंद्राकडून सूचना
ड 9 ऑक्टोबरनंतर वाद मिटविण्यासाठी निर्णायक हालचाली केल्या जाणार
Comments are closed.