Ratnagiri News – महामार्गाच्या कामासाठी गाळ वाहतुकीने रस्त्यावर धुळीचे लोट; खडीमुळे अपघाताचा धोका
चिपळूण शहरातील पाग येथील मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या कामासाठी गाळाची वाहतूक सुरू असून, बावशेवाडी ते पाग परिसरातील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात चिखल व खडी पडत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने या चिखलाचे रूपांतर धुळीत होत असून, मोठी वाहने गेल्यानंतर रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरातील बावशेवाडी येथील एका खाजगी जागामालकाच्या मैदानात नदीतील गाळ साठवून ठेवण्यात आला आहे. या गाळाची सध्या वाहतूक करून बावशेवाडी ते पाग पुलाच्या कामासाठी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर चिखल तसेच नदीतील खडी मोठ्याप्रमाणात पडत आहे. पावसाच्या काळात या रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढत असून, मोठी वाहने गेल्यानंतर शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर तसेच छोट्या वाहनांवर चिखल उडत आहे.
पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावर साचलेला चिखल व माती सुकल्याने मोठ्या वाहनांच्या वाहतुकीदरम्यान धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना धुळीचा देखिल त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेली खडी आणि माती यामुळे वाहन घसरण्याची शक्यता असून, या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. संबंधित लघुपाटबंधारे विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यावर पडणारा गाळ, चिखल व खडी हटवावी, तसेच धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments are closed.