Cloudy weather in Mumbai, yellow alert for many districts including Thane


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उकाडा वाढला आहे. घराबाहेर पडल्यानंतर होणारी गरमी यामुळे नागरिक हैराण झाला आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. पण दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच मुंबईत मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु, हवामान विभागाकडून मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार असे बोलले जात आहे, मात्र यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे, ज्यामुळे हातात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Maharashtra Weather: Cloudy weather in Mumbai, yellow alert for many districts including Thane)

बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे. अशातच बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे या दरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 16 मे पर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, पुद्दुचेरी, कराईकल, रायलसीमा, आंध्र प्रदेशातील किनारी भाग या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा… Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीनंतर देशातील वातावरण काय…नवीन सर्व्हे काय सांगतो

मे महिन्याला सुरुवात झाली आणि राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. आज बुधवारी (ता. 14 मे) विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट विभागासह), नाशिक (घाट विभागासह), कोल्हापूर (घाट विभागासह), सातारा (घाट विभागासह), सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.



Source link

Comments are closed.