मुख्यमंत्र्यांनी सांगलीकरांच्या तोंडाला पाने पुसली, 500 कोटींचा प्रकल्प; शेरीनाल्याच्या प्रश्नावर फक्त आश्वासन

सांगली शहराला सातत्याने भेडसावणारा महापुराचा धोका टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 500 कोटींचा प्रकल्प राबविला जाईल आणि शेरीनाल्यांचा प्रश्नही लवकरच सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगलीकरांच्या तोंडाला पाने पुसली.

सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सांगलीतील प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्री ठोस निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा भाजपाच्या पदाधिकाऱयांसह सांगलीकरांना होती. मात्र, अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगून मुख्यमंत्री फडणवीस घाईने पुण्याकडे रवाना झाले.

शहरातील शिंदे मळा, अभयनगर येथील लव्हली सर्कल परिसरात उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, पृथ्वीराज देशमुख, सुमन पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त सत्यम गांधी, जि.प.चे सीईओ विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर, उपाध्यक्ष संतोष पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, रमेश शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर आभार आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी धनगरी ढोलवादन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यात आले. महावितरणच्या पाच नवीन 33/11 केव्ही उपकेंद्रांचे आा@नलाइन भूमिपूजन करण्यात आले.

Comments are closed.