मंत्रीपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणेंना कानपिचक्या

महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे चिथावणीखोर विधाने करत असतात. एका विशिष्ट समाजाबद्दल टोकाचे बोलत असतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली. मंत्रीपदावरील व्यक्तीने बोलताना संयम बाळगणे गरजेचे आहे, आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
लोकमत वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. नितेश राणेंबद्दलच्या प्रश्नावर पुढे बोलताना ते म्हणाले की, “माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असल्याचे नितेश राणे म्हणाले होते. त्याबद्दल जयंत पाटील यांनी विचारतानाच तीन लाडक्या मंत्र्यांची नावे सांगा असे फडणवीसांना सांगितले. त्यावर, आपण मुख्यमंत्री लाडका मंत्री योजना सुरू केली असून निकषांमध्ये जे बसतील त्यांचा विचार करू, असे फडणवीस म्हणाले.
Comments are closed.