शेतकऱ्यांना 2026 पर्यंत दिवसा 12 तास मोफत सोलर वीज, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात 2026 पर्यंत दिवसा 12 तास मोफत सोलर वीज पोहोचवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

कोरडवाहू शेती बागायतीत रूपांतरित करण्याचा ‘मिशन’ सरकार राबवत आहे. शासनाने एका महिन्यात सर्वाधिक सौर कृषी पंप बसवण्याचा जागतिक विक्रम केला आहे. राज्यातील प्रत्येक शेतकयाला दिवसा 12 तास मोफत वीज पोहचविण्याचे काम या माध्यमातून होईल, असे फडणवीस म्हणाले.

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व यांत्रिकीकरणाचा वापर वाढवला जात असून त्यामुळे शेती फायदेशीर ठरणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानातील बदलांचा परिणाम कमी करता येऊ शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्पांतर्गत 500 किलोमीटर नवीन नदी प्रवाह तयार करून पश्चिम महाराष्ट्रातील खारपान पट्टय़ासह दुष्काळग्रस्त भागात सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांचा डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने गौरव

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त अमरावती येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

Comments are closed.