CM Devendra Fadnavis first reaction on Vaishnavi Hagawane suicide case
वैष्णवी हगवणे प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून म्हणजेच अनिल कस्पटे यांच्याकडून जी माहिती देण्यात येईल, त्या आधारावरच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
मुंबई : वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षातून हकालपट्टी केलेले राजेंद्र हगवणे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. पण ते आणि त्यांचा मुलगा सुशिल हगवणे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून ते दोघेही फरार आहेत. तर वैष्णवीची सासू लता, नवरा शशांक आणि नणंद करिष्मा हे तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून म्हणजेच अनिल कस्पटे यांच्याकडून जी माहिती देण्यात येईल, त्या आधारावरच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. (CM Devendra Fadnavis first reaction on Vaishnavi Hagawane suicide case)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, वैष्णवीच्या मृत्यूचे प्रकरण ही माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. वैष्णवीचे बाळ आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. बाळ सुखरुप राहिले पाहिजे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. वैष्णवीचं बाळ हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आजोबांकडे पोहचले आहे. वैष्णवीच्या मृतदेहावर जे वळ आढळून आले आहेत आणि या प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत त्याच अनुषंगाने चौकशी केली जाईल. वैष्णवीच्या वडिलांचे जे म्हणणे आहे त्यावर आधारितच चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता फडणवीसांकडून या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
तर, याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला या लग्नाला बोलवले होते, म्हणून मी गेलो होतो. पण या प्रकरणाशी माझा संबंध काय? मी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अद्याप प्रसारमाध्यमांसमोर बोललो नव्हतो. उद्या मी कोल्हापूरला आणि परवा पुण्याला जाणार आहे. तिथे मी यावर सविस्तर बोलेन. पण याबाबत एवढंच सांगेन की, याप्रकरणी पोलीस ठाण्यात नमूद केलेल्या गुन्ह्यात शशांक राजेंद्र हगवणे (वैष्णवीचा पती) व आणखी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. माझा त्यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. फक्त त्या लग्नाला हजर होतो, एवढाच माझा त्यांच्याशी संबंध. लग्नाला गेल्यामुळे उगाच माझ्यामागे असे लचांड लागते, असे यावेळी अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले.
Comments are closed.