मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं, संजय राऊत यांचे आव्हान

नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना ही नेहमी सक्रिय आहे. मनसेसुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असते. नाशिक हे धार्मिक पवित्र शहर आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं, नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं. आज नाशिकमध्ये जी परिस्थिती आहे, त्याविरोधातही शिवसेनेने आंदोलन केले आहे. ड्रग्जच्या विरोधात सर्वात मोठा मोर्चा शिवसेनेने काढला होता. आज नाशिकमध्ये एक प्रकारचं अराजक सुरू आहे. नाशिकच्या महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्यामुळे नाशिक शहराची संपूर्ण वाट लागली आहे. इथल्या लोकांना पाणी, रस्त्याच्या सुविधा नाहीत. नाशिकमध्ये गुंडगिरी सुरू आहे, नाशिकमध्ये ड्रग्ज विक्री सुरू आहे, तरुण व्यसनाधीन होत आहे. नाशिकमधले शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि हे नाशिक शहर ज्या मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी दत्तक घेतले होते, त्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था पहावी. आम्ही त्यांना याबाबात वारंवार कळवलं, आंदोलन केले, रस्ता रोको केले. शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन विराट मोर्चा काढावा, आक्रोश मोर्चा काढावा असे ठरले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे. अभ्यंकर हे नाशिकमध्ये पोहोचले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.