CM देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील; महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती
यवतमाळ : राज्यात एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज माफी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे. दरम्यान, कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. तर, आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू, असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. तर, पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त 40 गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू, असे वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनीही आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे, शासन स्तरावर शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात, मंत्री संजय राठोड यांनी तसे सूतोवाचही केले आहे.
शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज – कृषिमंत्री
मी शेतकरी पुत्र, माझा जन्म शेतकरी घरात झाला आहे. सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, रात्री झोपायला गेल्यावर ही शेती दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहित आहेत, असे म्हणत शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असे नव्याने कृषि खात्याचा पदभार स्वीकारलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले होते. धाराशिव येथे शेती नुकसान पाहणीसाठी आले असता त्यांनी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं. एक शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केलं होतं.
हेही वाचा
मुंबई ते मराठवाडा… जिकडे तिकडे पाणीच पाणी, धबधबा वाहिला तर कुठं अख्ख पीक पाण्यात, जीवघेणी कसरत
आणखी वाचा
Comments are closed.