आधी आम्हाला गोळ्या घाला! बारसूच्या माळरानावर पुन्हा आंदोलन पेटणार, ग्रामस्थ आक्रमक; दहा पटीने अधिक विरोध करण्याचा निर्धार

‘रिफायनरी प्रकल्प बारसूलाच होणार’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर बारसू-सोलगाव पंचक्रोशीतून पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी लढय़ाची ठिणगी पडली आहे. या प्रकल्पाला आधीपेक्षा दहा पटीने तीव्र विरोध करू, असे ठणकावतानाच ‘आधी आम्हाला सर्वांना गोळय़ा घाला, नंतरच रिफायनरी प्रकल्प करा’, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

रत्नागिरी जिह्यात राजापूरमधील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्याबाबत गावांनी ठरावही केलेले आहेत. 25 एप्रिल 2023 रोजी येथे आंदोलनाचा भडका उडाला होता. बारसूच्या माळरानावर प्रकल्पासाठी माती परीक्षण केले जाणार होते. ते ग्रामस्थांनी हाणून पाडले. तेव्हा आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला होता. त्यानंतर या प्रकल्पाबाबत सरकार बॅकफूटवर गेले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा हा प्रकल्प पुढे रेटला असून हरित रिफायनरी बारसूतच होणार, असा पवित्रा घेतल्याने त्याचा गावकऱयांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

बारसू सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. या प्रकल्पाला बारसू आणि पंचक्रोशीतील गावांचा विरोध आहे. त्यात शिवणे खुर्द, धोपेश्वर, गोवळ, देवाचे गोठणे, धुऊलवल्ली अशा गावांचा समावेश आहे.

बारसू नेमके कुठे

बारसूच्या सडय़ावर (जांभा खडकाचे विस्तृत पठार) रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसू गाव रत्नागिरीतील राजापूरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे तर समुद्र किनाऱयापासून साधारण 10 -15 किलोमीटर आत आहे. नाणारमधील 17 गावांची जमीन याकरिता संपादित केली जाणार आहे. त्यापैकी 14 गावांनी या प्रकल्पाविरोधात ठराव संमत केला होता.

निषेधाचा?

तळकोकणातील हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. रिफायनरी आल्यास मच्छीमारांचे नुकसान होईल. पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढेल, अशी भीती लोकांना आहे. विशेषत आंबा, नारळ, काजू, सुपारीच्या बागायतदारांचे नुकसान होईल. सडय़ावरील कातळशिल्पही नष्ट होण्याची भीती आहे. परंतु, ही ग्रीन रिफायनरी असून तिच्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात येते.

नाणारमधून बारसूमध्ये

तब्बल सहा कोटी मेट्रिक टन तेल उत्पादनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकरिता आधी नाणारमध्ये 14 हजार एकर जागा घेतली जाणार होती. परंतु, स्थानिकांच्या विरोधानंतर तेथून तो 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारसूमध्ये हलविण्यात आला. त्यावेळी साधारण सहा हजार एकर जमिनीवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता.

लवकरच सभा घेऊन रणनीती ठरवणार

देवाचे गोठणे येथे बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची आज तातडीची बैठक झाली. या बैठकीत रिफायनरीला विरोध यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार संघटनेसह पंचक्रोशीने केला. लवकरच एक मोठी सभा घेऊन त्यात पुढील रणनीती जाहीर करण्यावरही एकमत झाले.

रिफायनरी बारसू-सोलगाव येथेच होणार असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्ही केलेला विरोध त्यांना कमी वाटतो की काय? मग यापुढे आम्ही आधीपेक्षा दहा पटीने अधिक विरोध करणार आहोत. प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत. आम्हाला सर्वांना गोळय़ा घाला आणि नंतरच रिफायनरी प्रकल्प करा. – काशीनाथ गोर्ले, शिवणे खुर्द, बारसू सोलगाव रिफायनरीविरोधी संघटना

शिवसेनेची भूमिका… आम्ही जनतेसोबत

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बारसू रिफायनरीसंदर्भातील शिवसेनेची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. ते म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणूनच शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांना महायुतीमध्ये बोलवले असावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसूबाबत शिवसेनेची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. लोकांना प्रकल्प हवा असेल तर ते स्वीकारतील. रिफायनरीमुळे तेथील जमीन जुमला, रोजगार नष्ट होणार आहेत. मच्छीमारांचा रोजगार नष्ट होणार आहे. समुद्राचे विष होणार आहे. प्रदूषण होणार आहे. कोकणचे हवामान बदलणार आहे. झाडे, पाने, फुलांना त्याचा फटका बसणार आहे. आंबा-काजू पिकांच्या बागा उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी कोकणवासीयांनी त्या प्रकल्पाला विरोध केला आहे. लोकांचा विरोध कायम राहिला तर शिवसेना त्यांच्यासोबत कायम राहणार आहे.

Comments are closed.