सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का! CNG दरात पुन्हा एकदा मोठी वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर होणार लागू
मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना वाढत्या महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरांमध्ये प्रति किलो १.५० रुपयांची लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीएनजीचा सुधारित दर आता ९१.५० रुपये प्रति किलो इतका झाला असून, हे नवीन दर १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
अवघ्या १५ दिवसांच्या आतच मुंबईत सीएनजीच्या दरात झालेली ही सलग दुसरी वाढ आहे. या निर्णयाचा थेट फटका केवळ खासगी सीएनजी वाहनधारकांनाच नाही, तर हजारो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाही बसणार आहे. इंधनावरील खर्च वाढल्यामुळे साहजिकच दैनंदिन प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांच्या खिशावरील आर्थिक भार आणखी वाढणार आहे.
दरवाढीमागे नेमके कारण काय?
महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थिती आणि नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य-पूर्वेतील संकटामुळे गॅसच्या खरेदी खर्चावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर देशांतर्गत गॅसचा पुरवठा कमी झाल्याने कंपनीला आयात केलेल्या रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसवर (RLNG) अधिक अवलंबून राहावे लागत आहे.
आयात केलेल्या गॅसचा खर्च तुलनेने अधिक असल्याने कंपनीच्या एकूण खरेदी खर्चात वाढ झाली आहे. हा वाढलेला खर्च काही प्रमाणात भरून काढण्यासाठी सीएनजीच्या किमतीत सुधारणा केल्याचे MGL ने म्हटले आहे. ग्राहकांना इंधनाचा नियमित पुरवठा सुरू ठेवणे हाही या निर्णयामागील उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
Comments are closed.