कोचचं काम शिकवणं, दोष देणं नाही; गौतम गंभीराच्या कोणत्या विधानावर भडकला माजी क्रिकेटपटू?

टीम इंडियाचे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी यंदा आयपीएलदरम्यान अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यात टाकले होते. मात्र हा निर्णय दोघांनी स्वखुशीने घेतलेला नसून त्यांना दबाव आणून संन्यासासाठी प्रवृत्त करण्यात आले, असा गंभीर आरोप माजी खेळाडू मनोज तिवारीने पुन्हा एकदा केला आहे. त्याने नाव न घेता मुख्य कोच गौतम गंभीर यांच्याकडे बोट दाखवले आहेत.

मनोज तिवारीने सांगितले की भारतीय संघात ‘ट्रांजिशन’चा मुद्दा जाणीवपूर्वक उचलून धरला गेला आणि त्याचा परिणाम म्हणून कोहली व रोहित यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. त्याच्या मते भारतीय क्रिकेटमध्ये ‘ट्रांजिशन’ची गरजच नाही कारण देशातील डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पुरेसा आणि गुणवत्तापूर्ण टॅलेंट उपलब्ध आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिवारी म्हणाला की भारतात जेव्हा गरज भासेल तेव्हा नवीन खेळाडू तयार आहेत. मग जबरदस्तीने ट्रांजिशनचा नैरेटिव का तयार केला जात आहे? त्याने सांगितले की या अनावश्यक वातावरणामुळेच विराट आणि रोहित यांनी, खेळायची इच्छा असूनही, हळूहळू कसोटी क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

तिवारीने कोलकाता कसोटीमधील पराभवानंतर गौतम गंभीर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरही जोरदार टीका केली. गंभीर यांनी पिचचे समर्थन करत फलंदाजांच्या तंत्रात कमतरता दाखवली होती. यावर तिवारी म्हणाला की कोचचे काम शिकवणे असते, दोष देणे नव्हे. जर फलंदाजांचे डिफेन्स कमजोर होते, तर सामन्यापूर्वी त्यांना तयार करणे हे कोचिंग स्टाफचेच काम आहे.

तिवारी पुढे म्हणाला की गंभीर स्वतः त्याच्या खेळाच्या काळात उत्कृष्ट स्पिन-खेळाडू होता. त्यामुळे त्यांनी संघातील खेळाडूंना अधिक मार्गदर्शन करणे आवश्यक होते. हरल्यानंतर असलेल्या त्रुटी खेळाडूंवर ढकलणे योग्य नसल्याचे त्याने स्पष्टपणे नमूद केले.

मनोज तिवारी आणि गौतम गंभीर हे एकेकाळी कोलकाता नाईट रायडर्ससाठी एकत्र खेळले होते. मात्र अलीकडच्या काळात तिवारी हे गंभीचा कट्टर टीकाकार म्हणून ओळखला जात आहे.

Comments are closed.