लोकलमधून निर्माल्य म्हणून फेकला नारळ; तरुणाच्या डोक्याला आदळून दुदैवी मृत्यू

धावत्या लोकल मधून फेकलेला निर्माल्याचा नारळ डोक्यावर आदळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसईमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. संजय भोईर (25) असे या तरुणाचे नाव असून तो नायगाव आणि भाईंदर खाडी बेटावर असलेल्या पाणजू बेटावर राहतो.
संजय भोईर हा गोरेगाव येथील खासगी कंपनीत नोकरीला होता. शनिवारी फेरीबोट विलंबाने सुरू असल्याने संजय हा नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी प्रवास करत कडेकडेने निघाला होता. याच दरम्यान धावत्या लोकल मधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला तो नारळ संजय याच्या डोक्याला लागला. यात संजय गंभीर जखमी झाला. याची माहिती तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्याला वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र गंभीर स्वरूपाची दुःखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तेथे त्याचा मृत्यू झाला.
दुर्घटनेची मालिका
बोट बंद झाल्यानंतर नागरिकांना या रेल्वे उड्डाणपूलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. धावत्या लोकल मधून निर्माल्य फेकल्यामुळे आतापर्यंत गावातील दहा ते बारा नागरिक जखमी झाले आहेत अशी माहिती येथील विलास भोईर यांनी दिली. काही वर्षांपूर्वी संजय यांच्या आईवडीलांचाही लाकुडफाटा आणण्यासाठी आपल्या छोट्या बोटीतून गेले असताना बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती विलास भोईर यांनी दिली. संजय याच्या पश्चात आता मोठा भाऊ कृणाल आहे. यापूर्वी वैतरणा रेल्वे खाडी पुलावर धावत्या लोकलमधून नारळ फेकल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.
नायगाव आणि भाईंदर खाडीच्या बेटावर पाणजू हे गाव आहे. या गावातील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो. काही वेळा हवामान बदलामुळे बोट विलंबाने सुरू असते. तर काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही बोट बंद पडते. अशा वेळी काही प्रवासी नागरिक नायगाव भाईंदर खाडी पुलावरून पायी प्रवास करतात.
Comments are closed.