…अखेर एलियाच्या कुटुंबाला शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या परदेशी तरुणाला भावाकडे सोपवले

एका 22 वर्षीय रशियन तरुणाने कुलाबा पोलिसांचा अक्षरशः अंत पाहिला. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या त्या तरुणाने ससून डॉक येथे समुद्रात उडी टाकली होती. तेव्हा पासून कुलाबा पोलीस त्याचा ’अतिथी देवो भव’ म्हणत सांभाळ करत होते. अजिबात सहकार्य न करणाऱ्या त्या तरुणाला खूप सांभाळून घेतले. अखेर मोठ्या कष्टाने त्याच्या भावाचा शोध घेऊन त्याला भावाच्या ताब्यात देऊन पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
१३ फेब्रुवारीच्या सकाळी एका परदेशी नागरिकाने ड्रग्जची नशा करून ससून डॉक येथील समुद्रात उडी टाकली होती. पण त्यावेळी मच्छीमारांनी त्याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर एका टॅक्सीत बसून तो निघाला पण चालकाला त्याचा संशय आल्याने त्याने तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. मग वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अरुणा सानप व त्यांच्या पथकाने एलिया उरयिन सेवा (22) या रशियन तरुणाला ताब्यात घेतले. त्याला स्वतःबद्दल काहीच सांगता येत नव्हते. उलट तो पोलीस ठाण्यात विक्षिप्तपणे वागत होता. पोलिसांसोबत आक्षेपार्ह वर्तणुक करत होता. त्यामुळे त्याला जे.जे इस्पितळात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर एलिया शुद्धीवर आला. पण तो पोलिसांना काहीच सहकार्य करीत नव्हता. पोलिसांनी सर्वतोपरी त्याची व त्याच्या कुटूंबियांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग होत नव्हता. पोलिसांनी त्याला ठाण्याच्या मनोरुग्णाच्या इस्पितळात नेण्याचे देखील ठरवले. दरम्यान, समाजमाध्यमाच्या माध्यमातून उपनिरीक्षक सानप व त्यांच्या पथकाला गोव्यात राहणाऱ्या एलियाच्या भावाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा भावाला संपर्क साधून मुंबईत बोलावून घेतले. आज अखेर न्यायालयाच्या समक्ष एलियाला हजर करून त्याला त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आले.
पाहुणचार केला आणि त्रासही सहन केला
एलिया हा रशियन तरुण असल्याने पोलिसांनी त्याचा पाहूणचार केला. त्याची इस्पितळात वैद्यकिय तपासणी करून घेतली. त्याला दाखल करून त्याची नियमाने काळजी घेतली. त्याला खाऊपिऊ घातले. आठमुठे पणा करणाऱ्या एलियाचा होणारा त्रास ही सहन केला. उत्तम दुभाजक व कॉमेंट्री करणाऱ्या एलियाने पोलिसांसमोर अजिबात तोंड उघडले नाही. त्यामुळे त्याचा पाहूणचार करण्याबरोबर पोलिसांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. आज अखेर त्याच्यापासून कुलाबा पोलिसांची सुटका झाली.
Comments are closed.