उत्तरेकडील राज्यांसाठी थंड लाटेचा इशारा

राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये तापमानात मोठी घट : हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर तापमानात सतत घट होत आहे. त्याचे परिणाम मध्य प्रदेशसह इतर मैदानी राज्यांमध्येही जाणवत आहेत. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडसाठी शीतलहरीचा इशारा जारी केला आहे. हिमाचल प्रदेशात थंडी सातत्याने वाढत आहे. ताबोसह तीन शहरांमध्ये तापमान उणे नोंदवले गेले आहे. आठ जिह्यांमधील तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले असून 21 शहरांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदले आहे.

उत्तरेकडून कोरडे, थंड वारे गुजरातपर्यंत पोहोचत आहेत. 10 वर्षांत प्रथमच 10 नोव्हेंबरपूर्वी सुरतमध्ये हिवाळ्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. याचदरम्यान रात्रीचे तापमान 17 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. गांधीनगर, अहमदाबाद, राजकोट आणि डीसा या शहरांमध्ये किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले. वडोदरा येथे सर्वात कमी तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

पर्वतांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे मध्य प्रदेशातही थंडावा पसरला आहे. नोव्हेंबरमध्ये प्रथमच पारा विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सोमवारी भोपाळ, इंदूर, उज्जैन आणि जबलपूरसह 20 जिह्यांमध्ये शीतलहरीचा इशारा जारी करण्यात आला. रविवारी रात्री 10 शहरांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले. राजगड हे राज्यातील सर्वात थंड ठिकाण होते, किमान तापमान 7.6 अंश सेल्सिअस होते. तसेच भोपाळमध्ये 8.8 अंश सेल्सिअस आणि इंदूरमध्ये 7.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

हिमवृष्टी सुरू होण्यापूर्वीच हिमाचल प्रदेशातही तीव्र थंडी सुरू झाली आहे. रविवारी रात्री 23 शहरांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी, सहा शहरांमध्ये 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि तीन शहरांमध्ये 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. ताबोमध्येही किमान तापमान उणे 5.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. कांगडा, सोलन, मंडी आणि हमीरपूर येथे शिमलापेक्षा थंड हवामान होते. शिमला येथे किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Comments are closed.