महाराष्ट्रात थंडी वाढणार, चार राज्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
देशभरात अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये हवामान बदलामुळे थंडीची लाट चांगलीच सक्रीय झाली आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य भागांमध्ये शीतलहर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यातील नीचांकी तापमान हे 4.5 अंशांवर पोहोचले आहे. हा गारठा अधिक वाढणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे.
उत्तरेकडून शीतलहर ही मध्य, पूर्व आणि दक्षिण हिंदुस्थानच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे मुंबईतही हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. त्यातच येता आठवडा हा गारठा कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून भाकित करण्यात आले आहे. राज्यामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा हा कायम आहे. तसेच काही भागांमध्ये पारा हा 10 अशांपेक्षा खाली आलेला आहे. घाटमाथ्यावर सध्या दाट धुक्याची चादर पसरली असून, दवबिंदू सकाळच्या वेळी पाहायला मिळत आहे.
देशाभरामध्ये सध्या तीव्र थंडी पडत आहे. यामध्ये उत्तर भारतातील लोक थंडीच्या लाटा आणि दाट धुक्यामुळे त्रस्त असताना, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) चार राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील हवामान आणखी बिघडू शकते.
हवामान विभागाने आज (२४ डिसेंबर) जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा जारी केला आहे. २८ डिसेंबर रोजी या राज्यांसाठी हलक्या पावसाचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. आयएमडीनुसार, २५ डिसेंबरपासून दिल्लीतील किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची अपेक्षा आहे. २४-२५ डिसेंबर रोजी किमान तापमान ७ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. सकाळी दाट धुके राहण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात थंडीची लाट सुरूच आहे. हवामान खात्याच्या मते, येत्या काही दिवसांत तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात पुढील चार दिवस दाट ते खूप दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. आज, बुधवारी राज्यातील ३२ जिल्ह्यांसाठी दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. बलरामपूर, श्रावस्ती, बहराइच, लखीमपूर खेरी, सीतापूर आणि सहारनपूर जिल्ह्यांसाठी दाट ते खूप दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. बरेली, बिजनौर, मुरादाबाद, रामपूर, पिलीभीत, शाहजहानपूर आणि आसपासच्या भागात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Comments are closed.