लाठीमाराची चिंता न करता मोर्चात या.

1 नोव्हेंबरच्या कार्यक्रमासंबंधी राहुल गांधी यांचे आवाहन

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

येत्या रविवारी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आघाडीने रामलीला मैदानावर मोर्चा आणि सभेचे आयोजन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी पदत्याग करावा, या मागणीसाठी हा कार्यक्रम आहे. पोलीस किंवा लाठ्या यांची चिंता न करता या कार्यक्रमाला या, असे आवाहन काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील लोकांना केले आहे. दिल्ली पोलिसांनी सभेला अनुमती दिली आहे. मात्र, मोर्चाला अनुमती नाकारली आहे. तसेच या कार्यक्रमाचा आयोजकांवर 14 अटी पोलिसांनी घातलेल्या आहेत.

या कार्यक्रमाला गांधी यांनी ‘चलो दिल्ली रामलीला मोर्चा’ असे नाव दिले आहे. हा साधा कार्यक्रम नाही. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी तो आयोजित करण्यात आला आहे. मतांची चोरी थांबविण्यासाठी आणि भारताच्या राज्यघटनेच्या संरक्षणासाठी हा मोर्चा आहे. हा केवळ एका पक्षाचा कार्यक्रम नाही. सर्वांनी यात सहभागी व्हावे. ज्यांना कोणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेशकुमार नको आहेत, त्या सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. केंद सरकारला त्याच्या उत्तरदायित्वाची जाणीव करुन द्यावी, असे त्यांचे आवाहन आहे.

भाजपला साहस नाही होणार

या कार्यक्रमात अडथळे आणण्याचे किंवा मोर्चा अडविण्याचे धाडस भारतीय जनता पक्षाला होणार नाही. आता त्यांची नाटके चालणार नाहीत. मी भारतातील विद्यार्थी गटांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करतो. हा मोर्चा प्रचंड असेल. देशाच्या आत्म्याचे प्रगटीकरण या मोर्चातून होईल. मी आपली प्रतीक्षा करत आहे, असा विश्वासही राहुल गांधी यांनी या आवाहनातून व्यक्त केला आहे.

कार्यक्रम कशासाठी…

राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार देशात मतांची चोरी होत आहे. ही चोरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार करीत आहेत. ही चोरी ते भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी करीत आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही वाचविण्याची आवश्यकता आहे. यासाठी हा कार्यक्रम योजिलेला आहे.

मोर्चाला नाही अनुमती

दिल्ली पोलिसांनी रामलीला मैदानात रविवारी सभा घेण्यास अनुमती दिली आहे. तथापि, मोर्चाला अनुमती दिलेली नाही. तसेच, या कार्यक्रमाला आलेल्या कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला रात्री दिल्लीत वास्तव्य करता येणार नाही, अशी अटही घालण्यात आली आहे. तसेच आणखी 12 अटी घाललेल्या आहेत.  या मोर्चाला आणि सभेला 10 लाख लोकांना जमविण्याची काँग्रेसची योजना आहे. तथापि, रामलीला मैदानाची लोकांना सामावून घेण्याची क्षमता केवळ 40 हजार ते 50 हजारची आहे, याकडेही अनेक राजकीय तज्ञांकडून लक्ष वेधले गेले आहे.

Comments are closed.