कमांडो सूरज पाराशर यांना 'शौर्य चक्र' प्रदान
जम्मू-काश्मीरमधील ‘चुंतावडी’ अभियानात शौर्य
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतीय नौदलाचे सागरी कमांडो अधिकारी सूरज पराशर यांना जम्मू-काश्मीरमधील ‘चुंतावडी अभियाना’त शौर्य गाजवून ते यशस्वी केल्यामुळे ‘शौर्यचक्र’ या मानाच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, सेनेच्या तिन्ही दलांचे प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पराशर यांच्याप्रमाणेच या पुरस्कार साहाय्य कमांडंट मोहम्मद शफिक, लेफ्टनंट कमांडर राम गोपाल आणि कॉन्स्टेबल सद्दाम हुसेन यांनाही हा पुरस्कार त्यांना अतुलनीय पराक्रमासाठी आणि प्रसंगावधानसाठी प्रदान केला गेला.
हे अभियान नोव्हेंबर 2024 मध्ये हाती घेण्यात आले. नोव्हेंबरच 5 आणि 6 दिनांकांना सागरी कमांडो सूरज पराशर यांच्या नेतृत्वात या अभियानाच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या विरोधात मोठे यश भारतीय सेनेने प्राप्त केले. या अभियानात एका महत्वाच्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली होती. हे अभियान होत असताना अचानक विशिष्ट स्थानी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास प्रारंभ केला होता. तथापि, सूरज पराशर यांनी प्रसंगावधान राखून आपल्या सहकाऱ्यांसह एका सुरक्षित स्थानाचा आश्रय घेऊन दहशतवाद्यांवर गोळीबार केला.
अभियान यशस्वी
सूरज पराशर आणि त्यांचे सहकारी यांनी उंचावर असणाऱ्या मोक्याच्या स्थानावरुन प्रतिहल्ला करुन लपलेल्या दहशतवाद्यांची कोंडी केली. त्यामुळे दहशतवाद्यांना त्यांचे लपलेले स्थान सोडून बाहेर पडावे लागले. यावेळी झालेल्या चकमकीत 1 महत्वाचा दहशतवादी पराशर यांनी टिपला. हे दहशतवादी चुंतावडी या खेड्यातील एका घरात लपून बसले होते. त्यामुळे या अभियानाला ‘चुंतावडी’ अभियान असे संबोधले जाते. हे अभियान यशस्वी झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार घडवून आणण्याचे दहशतवाद्यांचे कारस्थान उध्वस्त झाले होते.
मोठा शस्त्रसाठा हस्तगत
एखाद्या छोट्या युद्धाला पुरेल असा मोठा शस्त्रसाठा दहशतवाद्यांनी या घरात केला होता. या घराचा ताबा घेऊन सूरज पराशर यांच्या तुकडीने हा शस्त्रसाठा हस्तगत केला. हा संघर्ष जवळपास दोन दिवस आणि एक रात्रभर चालला होता. सा सर्व कालावधी पराशर यांच्या तुकडीने दहशतवाद्यांना निसटण्याची संधी मिळू दिली नाही. अनेक तासांच्या नंतर भारताच्या भूसेची एक मोठी तुकडी अभियानाच्या स्थानी पोहचली आणि या तुकडीने पुढचे अभियान पूर्ण केले होते.
अजोड निर्णयशक्तीचा परिचय
या संपूर्ण अभियानात सूरज पराशर आणि त्यांचे सहकारी यांनी अजोड निर्णयशक्तीचा परिचय घडविला. त्यांच्या सेवाकक्षेच्या बाहेर जाऊन पराशर यांनी काही महत्वाचे निर्णय या संपूर्ण अभियानाच्या कालावधीत घेतल्याने हे अभियान यशस्वी झाले, अशी माहिती भूसेनेच्या प्रवक्त्यांनी नंतर दिली. प्रसंगावधान राखून निर्णय घेतल्याने हे अभियान पूर्ण यशस्वी झाल्याचे दिसून आले.
Comments are closed.