आयुक्त महोदय… निधी द्या, निधी द्या, निधी द्या! ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाडला पत्रांचा पाऊस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अर्थसंकल्प सादर होताच ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे कोट्यवधींच्या निधीसाठी तगादा लावला आहे. शहरातील ३३ प्रभागांत विविध विकासकामे करण्यासाठी आयुक्त महोदय… निधी द्या, निधी द्या, निधी द्या असे म्हणत नगरसेवकांनी अक्षरशः पत्रांचा पाऊस पाडला आहे. कोणी दहा, कोणी २० तर कोणी ५० कोटींच्या निधीची मागणी १३१ पैकी १२८ नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे.

महापालिका निवडणुका न झाल्याने गेल्या चार वर्षांपासून शहराचा कारभार प्रशासनाच्या हातात होता. नगरसेवक नसल्याने निधी शहरातील प्रभाग वाऱ्यावर होते. त्यामुळे अनेक प्रभागांतील रेंगाळलेली कामे करण्यासाठी आता सर्वच नगरसेवकांनी कंबर कसली आहे. नुकताच ठाणे पालिकेने ६ हजार २२१ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला असून त्यावर तब्बल चार दिवस चर्चा सुरू होती, तर यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची चर्चा पहाटेपर्यंत रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आल्यानंतर आयुक्तांच्या टेबलावर निधीसाठी चक्क पत्रांचा ढीग लागला आहे.

वर्षाला १ कोटी ४० लाखांचा निधी
प्रशासकीय पातळीवर यापूर्वी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामांसाठी ४० लाखांचा निधी वर्षाला मिळत होता. त्यानंतर महासभेत तरतूद करून या निधीमध्ये हळूहळू वाढ झाली. मात्र यावर्षी पहिल्यादांच प्रत्येक प्रभागासाठी १ कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. आता प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला १ कोटी ४० लाखांचा निधी खर्च करायला मिळणार आहे.

प्रभागातील कामांना गती मिळावी यासाठी सर्वच नगरसेवक आग्रही असून अर्थसंकल्पाच्या पूर्वीपासून नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना निधीसाठी प्रस्ताव दिले आहेत.

सध्याच्या घडीला ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नगरसेवकांच्या प्रस्तावांचा विचार करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Comments are closed.