20 वर्षानंतर पुन्हा भारतात कॉमनवेल्थ गेम्स?

सीडब्ल्यूजी 2030 साठी अहमदाबाद शहर दावेदार : केंद्र सरकारने दिली मंजुरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2010 सालानंतर आता सुमारे 20 वर्षांनी म्हणजेच 2030 मध्ये भारतात पुन्हा एकदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या आयोजनासाठी दावा करण्यास मंजुरी दिली आहे. याच्या अंतर्गत गुजरात सरकारसोबत होस्ट कोलॅबोरेशन अॅग्रीमेंट आणि ग्रँट-इन-एडलाही मंजुरी देण्यात आली आहे. अहमदाबाद शहरात विश्वस्तरीय स्टेडियम, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि खेळांबद्दल मोठे प्रेम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद शहरातच असून तेथे 2023 च्या क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना यशस्वीपणे पार पडला आहे. तर अहमदाबाद शहराला राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली तर हे शहर 72 देशांच्या भागीदारीचा साक्षीदार ठरणार आहे. याचबरोबर रोजगार, पर्यटन आणि विविध क्षेत्रांमध्ये असंख्य संधी निर्माण होणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या काही दिवसांपूर्वी भारतीय ऑलिम्पिक संघाने (आयओए) स्वत:च्या विशेष साधारण बैठकीत या दावेदारीला औपचारिक मान्यता दिली होती. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत सर्वसंमतीने 31 ऑगस्ट रोजीच्या कालमर्यादेपूर्वी दावेदारीचा प्रस्ताव भारताने मांडावा असा निर्णय घेण्यात आला होता. 2030 राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावा करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. आयओए पुढील 48 तासांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दावेदारी मान्य झाल्यास गुजरात सरकारला ग्रँट-इन-एड आणि होल्ट कोलॅबोरेशन अॅग्रीमेंटची सुविधा दिली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

क्रीडाप्रकारांबद्दल विनंती

दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा 2010 ने भारताला जागतिक क्रीडा नकाशावर नवी ओळख मिळवून दिली होती. त्याच अनुभवाच्या आधारावर भारत आता 2030 मध्ये आणख्घ समावेशक राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखत आहे. 2026 च्या  राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतून अनेक मोठे क्रीडाप्रकार हटविण्यात आले आहेत, हे क्रीडाप्रकार पुन्हा सामील करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, यात हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, डायव्हिंग, रग्बी, बीच वॉलिबॉल, माउंटेन बायकिंग, स्क्वॅश आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्स सामील आहे. हे क्रीडाप्रकार केवळ भारतात नव्हे तर राष्ट्रकुल देशांमध्येही अत्याधुनिक लोकप्रिय आहेत.

रोजगार अन् पर्यटन वाढणार

भारताला 2030 राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास हे आयोजन 72 देशांच्या भागीदारीचा साक्षीदार ठरणार आहे. याच्या माध्यमातून लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पर्यटनाला नवा वेग मिळेल आणि क्रीडाक्षेत्राशी निगडित उद्योगांसोबत अन्य क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे.

Comments are closed.