राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?

Commonwealth Games 2030 म्हणजेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेच्या कार्यकारी मंडळाने यजमानपदासाठी हिंदुस्थानच्या अहमदाबाद शहराचा प्रस्ताव पुढे पाठवला आहे. हा प्रस्ताव आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सदस्यांपुढे ठेवण्यात येईल. त्यानंतर अंतिम मंजूरी आणि हिंदुस्थानच्या पारड्यात राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद पडू शकते. यासाठी 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये स्पर्धेच्या ठिकाणाची निवड होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान व्यतिरिक्त यजमान पदाच्या शर्यतीत नायजेरियाने सुद्धा रस दाखवला. परंतू नायजेरियाला मागे सारत कार्यकारी मंडळाने अहमदाबादच्या नावाचा प्रस्ताव पुढे पाठवला आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत आधी कॅनडाचेही नाव होते, मात्र त्यांनी आधीच माघार घेतली होती. तसेच राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदासाठी फारसे कुणी देश उत्सुक नसल्यामुळे 2030 च्या आयोजनाची संधी हिंदुस्थानलाच मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी दिल्ली येथे 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 चे आयोजन करण्यासाठी हिंदुस्थानची शिफारस होणे हा जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून हिंदुस्थानच्या प्रवासातील एक अभिमानास्पद टप्पा आहे. हा आपल्या देशाच्या क्रीडा भावनेचा आणि प्रतिभेचा उत्सव आहे, असे रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या.
Comments are closed.