हैदराबादमध्ये जटिल शस्त्रक्रिया यशस्वी
वृत्तसंस्था / हैद्राबाद
हैद्राबादमध्ये एका 8 महिन्याच्या अर्भकावर कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या बालकाच्या श्वासनलीकेत कर्करोगाची लागण झाली होती. ही शस्त्रक्रिया जटील समजली जाते. या अर्भकाला जन्मापासूनच तीव्र खोकला, छातीत कफ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसत होते. तपासणी केल्यानंतर त्याच्या श्वासनलीकेत कर्करोगाची वाढ होत असल्याचे निदान करण्यात आले होते. त्यामुळे अधिक काळ वाट पाहणे योग्य नव्हते. म्हणून हे अर्भक केवळ आठ महिन्याचे असतानाच ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या श्वासनलिकेत 4.5 सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ झालेली होती.
बुधवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे या अर्भकाचा श्वासोच्छवास आता योग्यरित्या होऊ लागला आहे. मात्र, हे अर्भक पूर्णपणे बरे होण्यासाठी अद्याप काही दिवसांचा वेळ लागणार आहे. ही शस्त्रक्रिया ‘लिटल स्टार्स अँड शी वुमन आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल’ येथे करण्यात आली आहे. अर्भकाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून शस्त्रक्रिया यशस्वी झालाची माहिती रुग्णालयाच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग
सर्वसाधारणपणे अशा शस्त्रक्रिया ‘ओपन सर्जरी’ पद्धतीने केल्या जातात. तथापि,य् या पद्धतीत रक्तस्राव अधिक होण्याची शक्यता असते. तसेच शस्त्रक्रियेचे जखम मोठी असल्याने पुढे रुग्ण बरा होण्यासाठी अधिक वेळ लागतो. तथापि, यावेळी नवे तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान ‘थोरॅरोस्कोपी’ या नावाने ओळखले जाते. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कापावे लागत नाही. तसेच कर्करोगाच्या गाठीपर्यंत पोहचण्यासाठी छोटया आकारची शस्त्रे उपयोगात आणली जातात. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते आणि शस्त्रक्रियेलाही कमीत कमी वेळ लागतो, अशी माहिती देण्यात आली आहे.
Comments are closed.