गुजरात मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल

हर्ष सिंघवी यांना उपमुख्यमंत्रिपदासह गृह खाते, 19 नवे चेहरे

वृत्तसंस्था / गांधीनगर

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष सरकारच्या मंत्रिमंडळाची व्यापक फेररचना करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर रात्री उशिराने खातेवाटपही जाहीर करण्यात आले. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सुरतचे आमदार हर्ष सिंघवी यांची नियुक्ती करण्यात आली असून मंत्रिमंडळात 19 नव्या मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. हर्ष सिंघवी यांच्याकडे गृह खात्याची धुराही सोपविण्यात आली आहे.

गुजरात मंत्रिमंडळातील मंत्रिपरिषदेची संख्या आता 26 झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता अन्य आठ जणांना कॅबिनेट मंत्री तर उर्वरित 16 जणांना राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. ही फेररचना करण्यासाठी गुरुवारी 16 मंत्र्यांना पदत्याग करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर ही फेररचना शुक्रवारी करण्यात आली. राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी सर्व नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते.

उपमुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्यात आलेले नेते हर्ष सिंघवी हे सुरतच्या माजुरा मतदारसंघातून तीनदा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते मागच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. गुजरातमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ती लक्षात घेऊन हे फेररचना करण्यात आली असल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले असून कोणत्याही निवडणुकीची सज्जता आधी करण्याची या पक्षाची रीत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नवे मंत्री कोण…

हर्ष सिंघवी, नरेश पटेल, दर्शना वाघेला, प्रद्युम्न वाजा, कांतिलाल अमृतिया, मनीषा वकील, अर्जुन मोडवाडिया, जितू वाघानी, कौशिक वेकारिया, स्वरुपची ठाकोर, त्रिकम छांगा, रिवाबा जडेजा, पी. सी. बरांदा, रमेश कटारा, ईश्वरसिंह पटेल, प्रवीण माळी, रामभाई सोळंकी, कमलेश पटेल आणि संजय सिंग महीदा अशा एकंदर 19 नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.

दोन जणांची पुनर्नियुक्ती

कनुभाई देसाई आणि पुरुषोत्तम सोळंकी यांची मंत्रिमंडळात पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याप्रमाणेच ऋषिकेश पटेल, प्रफुल्ल पनशेरिया, कन्वरजी बवालिया, कनुभाई देसाई आणि पुरुषोत्तम सोळंकी यांचीही पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक मंत्र्यांचे विभागही पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. तर काही जणांच्या विभागांमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात पटेल समाजाचे 9 तर अन्य मागासवर्गिय समाजाचे 10 मंत्री आहेत. अशा प्रकारे नव्या मंत्रिमंडळामध्येही जातीची समीकरणे योग्य रितीने सांभाळण्यात आलेली आहेत.

रविंद्र जडेजाच्या पत्नीला स्थान

भारताचा सुविख्यात क्रिकेट खेळाडू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा हिलाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याना राज्यमंत्री बनविण्यात आले असून प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. रिवाबा या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेल्या अर्जुन मोडवाडिया यांनाही मंत्री होण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानांही राज्यपालांच्या हस्ते शपथ देण्यात आली आहे.

Comments are closed.