शेतकर्यांच्या हितसंबंधांशी तडजोड करणे अशक्य आहे!
पंतप्रधान मोदी यांचा निर्धार, किंमत चुकविण्यासही सज्ज, ट्रंप यांच्या करांना ठामपणे तोंड देणार
अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर
- अमेरिकेच्या व्यापारशुल्क दबावाला भारताने दिले ठाम आणि ठोस प्रत्युत्तर
- कोणत्याही परिस्थितीत भारतातील दुर्बल घटकांच्या हिताकडे दुर्लक्ष नाही
- ट्रंप यांच्या भारतावरील दबावाचे खरे कारण आहे अमेरिकेतील तेलाची लॉबी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतातील शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या या निर्धाराची मोठी किंमत मला चुकवावी लागू शकते, पण मी त्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत भारत आपले शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक यांच्या पाठीशी ठाम उभा राहील. त्यांना कधीही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. यासाठी मला कोणतेही अग्निदिव्य करावे लागले तरी मी मागे हटणार नाही. कारण या समाजघटकांचे हित हाच आमचा प्राधान्याचा विषय आहे. कितीही दबाव आला तरी, आम्ही त्याला तोंड देऊ, अशी भूमिका त्यांनी गुरुवारी स्पष्ट केली.
वॉशिंग्टनला स्पष्ट संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. अमेरिकेने कर आकारणी करण्यासाठी भारताच्या हिताचा विचार दूर ठेवला आहे. अशा स्थितीत भारत अमेरिकेच्या दबावासमोर मान खाली घालणार नाही, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यातून अमेरिकेला दिला गेला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेकडून भारत ‘लक्ष्य’
रशियाकडून तेल खरेदी केल्याचा ठपका ठेवून अमेरिका भारताला लक्ष्य करीत आहे. मात्र, केवळ भारतच नव्हे, तर अनेक देश रशियाकडून तेल खरेदी करतात. तथापि, भारतालाच करवाढीसाठी निवडण्यात आले आहे. अमेरिकेची ही भूमिका अन्याय्य, असमतोल आणि असमर्थनीय आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र विभागाने दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने भारताचे एकंदर धोरण स्पष्ट होत आहे.
अमेरिकेच्या तेललॉबीचा दबाव ?
अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आधार घेतला आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल घेत असल्याने रशियाला पैशाचा पुरवठा होतो. त्यामुळे तो देश युक्रेनशी युद्ध करु शकतो, असे ट्रंप यांचे म्हणणे आहे. मात्र, भारतावर ते जो दबाव टाकत आहेत, त्याचे मूळ कारण रशिया, युक्रेन किंवा त्यांच्यातील युद्ध हे नसून अमेरिकेतील प्रबळ तेललॉबी आहे, असे बोलले जात आहे. भारत आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेलउपयोगकर्ता देश आहे. भारताची प्रतिदिन तेलाची आवश्यकता 50 ते 60 लाख बॅरल इतकी आहे. रशियाकडून भारत स्वस्त दरात तेल घेत असल्याने जागतिक बाजारात तेलाचे दर वाढत नाहीत.
अमेरिकेत जे तेल सापडते, त्याचा उपसा करणे महाग आहे. त्यामुळे अमेरिका ते तेल स्वस्त विकू शकत नाही. म्हणून जागतिक बाजारात तेलाचे दर प्रतिबॅरल 80 डॉलर्सच्या वर असावेत, अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्यामुळे रशियाचा स्वत तेलपुरवठा थांबविण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे. रशियाचे तेल अमेरिका थेट थांबवू शकत नाही. म्हणून जे देश हे तेल विकत घेतात, त्यांना रोखण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे. रशियाचे स्वस्त तेल बाजारात येण्याचे थांबले की सर्व देश अमेरिकेकडे तेलासाठी धाव घेतील आणि अमेरिकेला मोठा लाभ होईल, असे अमेरिकेच्या तेल लॉबीचे तर्कशास्त्र आहे, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. या संबंधातील नेमके चित्र स्पष्ट होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी जावा लागेल, असेही दिसून येत आहे.
Comments are closed.