द्राक्षबागांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या! द्राक्ष बागायतदार संघाची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सांगली जिह्यात अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत; परंतु द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत, असा शासकीय नियम आहे. सध्याची परिस्थिती पाहाता द्राक्ष पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱयांना भरपाई मिळावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघातर्फे जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे. जिल्हा बागायतदार संघाच्या वतीने निवेदन आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले. यावेळी राज्य बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव तुकाराम माळी आदी उपस्थित होते.
सांगली जिह्यात गेली चार वर्षे अतिवृष्टी होत आहे. संपूर्ण शेती, शेतकरी अडचणीत आहेत. यावर्षी मेच्या सुरुवातीला गारपिट होऊन तासगाव, मिरज, जत, खानापूर, पलूस व वाळवा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणी, खरड छाटणीपासून साधारणतः 40 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये काडीवरील डोळ्यामध्ये सुप्त अवस्थेत सूक्ष्म घड निर्मिती होत असते. त्यासाठी कडक ऊन असण्याची आवश्यकता असते. परंतु याच काळात जिह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झालेले आहे.
खरड छाटणीनंतर काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होण्यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तसेच बागेत सतत पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्ष बागांच्या मुळ्या कुजून गेल्या. मुळ्या निक्रिय झाल्यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान होणार आहे. जिह्यामध्ये आज अखेर 90 टक्के द्राक्षबागांची फळछाटणी झालेली नाही. सप्टेंबर अखेरपर्यंत दरवर्षी 50 टक्के द्राक्षक्षेत्रावर फळछाटणी होत असते.
यंदा इतर पिकांचे नुकसान हे नजरेने दिसते; परंतु द्राक्षपिकाचे सद्यस्थितीतील नुकसान नजरेने दिसत नाही. सध्या इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत, असा शासकीय नियम असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहाता फळधारणेस अडचणी येऊ शकतात, त्यामुळे पूर्ण वर्ष वाया जाणार आहे. सर्व पिकासाठी सरसकट नुकसानभरपाईमध्ये सांगली जिह्याचा समावेश राज्य शासनाने करावा, अशी मागणी द्राक्षे बागायतदार संघाने केली आहे.
Comments are closed.