जैशचा दहशतवादी मसूद इलियास काश्मिरीचा कबुलीजबाब! ISI शी संबंध, रावळकोटमध्ये तळ
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील दहशतवादी तळ आणि दहशतवादी कमांडर यांचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी असलेले संबंध उघड झाले आहेत. पाकव्याप्त कश्मीरमध्ये (पीओके) गेल्या साडेपाच महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी, पाक समर्थक राजकीय पक्ष आणि गटांनी सोमवारी इस्लामाबादमध्ये ‘पूंच ऐवान’ नावाची बैठक आणि चर्चा आयोजित केली होती. या बैठकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मिरीने आयसिसशी संबंध आणि रावळकोटमध्ये दहशतवादी तळ असल्याचा कबुलीजबाब दिला.
राजकीय पक्ष आणि गटांनी आयोजित केलेल्या या बैठकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि यूएपीए अंतर्गत घोषित दहशतवादी मसूद इलियास काश्मिरी उर्फ अबू मोहम्मद हा देखील उपस्थित होता. बैठकीदरम्यान, या दहशतवादी संघटनेचा तळ रावळकोटमध्ये असल्याचे काश्मिरीने जाहीरपणे सांगितले.
दहशतवादी मसूद इलियास काश्मिरीने पाकिस्तान समर्थक राजकीय पक्ष आणि गटांना निवेदन दिले. यात निवेदनात, जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या आपल्या दहशतवाद्यांचा पाकव्याप्त कश्मीरमध्ये (PoK) होणाऱ्या हिंसाचारात कोणताही सहभाग नसल्याचे काश्मिरीने म्हटले आहे. तसेच दहशतवादी मसूद इलियास काश्मिरीने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांशी (ISI) असलेल्या संबंधांचाही जाहीरपणे खुलासा केला.
इस्लामाबादमधील गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली होती. रावळकोटमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या कथित 22 दहशतवाद्यांची यादी दिली. मात्र, काश्मिरीने गुप्तचर यंत्रणांचा दावा फेटाळून आंदोलनात सहभागी असलेले लोक जैश-ए-मोहम्मदचे सदस्य नसल्याचे सांगितले. तसेच पाकव्याप्त कश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील धरमसाल भागात जैश-ए-मोहम्मदचे एक केंद्र आहे. मात्र, तेथे राहणारे दहशतवादी कोणत्याही पाकिस्तान समर्थक राजकीय पक्षाच्या नेत्याच्या घराला घेराव घालण्यात सहभागी नव्हते, असे काश्मिरीने या बैठकीत म्हटले आहे.
Comments are closed.