उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षांतर्गत संघर्ष
पक्षाच्या 3 आमदारांनी घेतली नितिन नबीन यांची भेट
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील नेते उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष राष्ट्रीय लोकमोर्चाच्या तीन आमदारांनी दिल्लीत जात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितिन नबीन यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या अध्यक्षांच्या लिट्टी चोख पार्टीपासून अंतर राखले आहे. यापूर्वीही रालोमोमध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले होते, परंतु कुशवाह यंनी दरवेळी एकजूट असल्याचा दावा करत नाराजीचे वृत्त फेटाळले होते. उपेंद्र कुशवाह यांच्यावर पुत्र दीपक प्रकाशला निवडणूक न लढविता मंत्री करण्यात आल्याने घराणेशाहीचा आरोप होतोय.
राज्यसभा खासदार कुशवाह यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी लिट्टी चोखा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक राजकीय नेते सामील झाले होते. परंतु कुशवाह यांच्या पक्षाचे तीन आमदार माधव आनंद, रामेश्वर महतो आणि आलोक सिंह यात सामील झाले नव्हते. यावरून अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
तर गुरुवारी रालोमोच्या तिन्ही आमदारांनी भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांची भेट घेतली आहे. रालोमोचे 4 आमदार असून यात कुशवाह यांच्या पत्नीही सामील आहेत. एकाचवेळी तीन आमदार अनुपस्थित राहिल्याने ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातेय. यापूर्वी आमदार राम़ेश्वर महतो यांनी सोशलमीडियावर स्वत:ची नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी नामोल्लेख टाळून पक्षनेतृत्वाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Comments are closed.