महायुतीने प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईची लूट केली! काँग्रेसकडून महाभ्रष्ट सरकारच्या कारनाम्याचे आरोपपत्र प्रकाशित

मुंबई महानगरपालिकेवर तीन वर्षे नऊ महिने प्रशासकाचे राज्य होते. लोकप्रतिनिधी नव्हते. या प्रशासकाच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने मुंबईकरांना लुटले आहे. मुंबईकरांना आज मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. केवळ कंत्राटदार व लाडके उद्योगपती यांना मुंबई विकण्याचे काम केले आहे. महायुती सरकारच्या या महाभ्रष्ट कारनाम्याचे आरोपपत्र मुंबई काँग्रेसने प्रकाशित केले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱयांच्या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते वाल्मीकी नगर, वांद्रे येथे महायुती सरकारच्या महाभ्रष्ट कारभाराचे आरोपपत्र प्रकाशित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अस्लम शेख, नसीम खान, भाई जगताप, अमिन पटेल, डॉ. ज्योती गायकवाड, प्रवत्ते सचिन सावंत उपस्थित होते. महायुती सरकारने देशाच्या आर्थिक राजधानीची आज वाताहत केली आहे. मुंबई हे भ्रष्ट महायुती कार्पोरेशन बनले आहे, त्यांच्या कारनाम्याचे आरोपपत्र मुंबई काँग्रेसने प्रकाशित केले आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Comments are closed.