ज्ञानेशकुमार यांना हटवण्याच्या मागणीवरून काँग्रेस आक्रमक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाली असून शुक्रवारी गुवाहाटी येथे आंदोलन करणारे आसाम काँग्रेसचे प्रमुख गौरव गोगोई आणि पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून विविध राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
जंतर-मंतर येथील आंदोलन स्थळ निदर्शकांसाठी बंद करण्यात आले, तर चंदीगड आणि पाटणा येथे निदर्शने करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला. मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेबाबत दिल्ली काँग्रेसच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरही सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
मध्यप्रदेश युवक काँग्रेसने भोपाळमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. डेहराडूनमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली. पंजाबमध्ये प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी कुमार यांना बडतर्फ करण्याची तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या कथित साथीदारांवर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली चंदीगडमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणाही केली.
कर्नाटकात प्रदेश काँग्रेस समितीने कुमार आणि एका भाजप आमदाराविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली.
Comments are closed.