काँग्रेसने राज्यसभेसाठी 6 उमेदवारांची घोषणा केली
तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवींना उमेदवारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेसने गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी 10 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या यादीत अभिषेक मनु सिंघवी, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार वेम नरेंद्र रेड्डी, फूला देवी नेताम, करमवीर सिंह बौध, अनुराग शर्मा आणि एम. क्रिस्टोफर तिलक सामील आहेत. सिंघवी आणि नरेंद्र रेड्डी यांना तेलंगणातून पक्षाचे राज्यसभा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. फूलो देवी नेताम, करमवीर बौध आणि क्रिस्टोफर तिलक यांना अनुक्रमे छत्तीसगड, हरियाणा आणि तामिळनाडूतून उमेदवार करण्यात आले आहे.
तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे निकटवर्तीय वेम नरेंद्र रेड्डी यांनी राज्यसभा उमेदवारी मिळाल्याप्रकरणी काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानले आहेत. 10 राज्यांच्या 37 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार असून याकरता 16 मार्च रोजी मतदान निर्धारित असून त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणातून राज्यसभेवर गेलेल्या 37 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये समाप्त होणार आहे. यामुळे नव्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी या जागा रिक्त होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत होती, तर आज या अर्जांची छाननी केली आहे. तर उमेदवार 9 मार्चपर्यंत स्वत:चा अर्ज मागे घेऊ शकणार आहेत.
Comments are closed.