काँग्रेसने पराभवाच्या कारणांचे विश्लेषण सुरू केले

राहुल गांधींची खर्गे यांच्याशी बंद दाराआड चर्चा : बिहारमधील दारुण पराभवानंतर दिल्लीत आपत्कालीन बैठक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिहारमधील दारुण पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत बंद दाराआड चर्चा केली. बिहार निवडणुकीत काँग्रेसला लढवलेल्या 61 पैकी फक्त 6 जागा मिळाल्यामुळे पक्षाची गेल्या 15 वर्षांतील दुसरी सर्वात वाईट कामगिरी झाली. या पराभवामुळे केवळ काँग्रेसच नाही तर संपूर्ण महाआघाडीला धक्का बसला असून आता दारुण पराभवाची कारणमीमांसा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

दिल्लीत शनिवारी सकाळी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत के. सी. वेणुगोपाल, अजय माकन आणि बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लावरू सहभागी झाले होते. निवडणुकीतील पराभवाची कारणे, संघटनात्मक कमकुवतपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका यावर अंतर्गत चर्चा झाल्याचे समजते. बैठकीनंतर राहुल माध्यमांशी न बोलता निघून गेले, परंतु काँग्रेस नेत्यांच्या विधानांवरून पक्ष हा पराभव स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून आले.

वेणुगोपाल यांचा निवडणूक आयोगावर ठपका

काँग्रेस पक्ष आता बिहारमध्ये इतक्या मोठ्या पराभवामागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर निवडणूक हेराफेरीचा आरोप केला. पक्ष अनियमिततेचे पुरावे गोळा करत असून येत्या दोन आठवड्यांत देशासमोर सादर केले जातील, असे काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी  सांगितले. काँग्रेसने बिहारच्या निवडणुकीत 61 जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांना फक्त सहा जागांवर विजय मिळाला. पक्षाचा मतांचा वाटा 8.71 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 2020 मध्ये 70 जागांवर लढून 19 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी त्यांना 9.6 टक्के मते मिळाली होती.

बिहारचे निकाल ‘अविश्वसनीय’ आहेत. एनडीएचा 90 टक्क्यांपेक्षा जास्त स्ट्राईक रेट भारतीय निवडणूक इतिहासात जवळजवळ अशक्य होता. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असून आयोगाची भूमिका एकतर्फी असल्याचे दिसून आले. पक्ष लवकरच डेटा गोळा करून ठोस पुरावे सादर करेल, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी प्रचारावेळी ‘मतचोरी’चा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला होता. त्यांनी वारंवार ईव्हीएम, मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. तसेच आताही निकाल एनडीएच्या बाजूने लागल्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडेच बोट दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

महाआघाडीत ‘अविश्वास’

एनडीएच्या सुनामीने केवळ काँग्रेसलाच नव्हे तर महाआघाडीलाही हादरवून टाकले आहे. तेजस्वी यादव यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत, डाव्या पक्षांचीही धुळदाण उडाली आहे. तसेच काँग्रेसलाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक मित्रपक्षांनी काँग्रेसच्या कमकुवत प्रचारावर अंतर्गत टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा पराभव विरोधी पक्षांसाठी एक मोठा मानसिक धक्का असल्याने त्यातून सावरणे कठीण होणार आहे.

Comments are closed.