काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज फेटाळला.
मध्यप्रदेशात राज्यसभेच्या जागांच्या शर्यतीतून काँग्रेस बाद : अर्जावर भाजपने घेतला होता आक्षेप
वृत्तसंस्था भोपाळ
मध्यप्रदेशातील राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून बाद करण्यात आला आहे. यामुळे राज्यसभेच्या तिसऱ्या जागेचे समीकरण बदलले असून भाजपचे तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता मजबूत झाली आहे. तर दुसरीकडे या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांच्या अर्जावर भाजपने आक्षेप घेतला होता. नटराजन यांनी स्वत:च्या प्रतिज्ञापक्षात हैदराबादच्या एका न्यायालयात प्रलंबित प्रकरणाची माहिती नमूद केली नसल्याचा भाजपचा आरोप आहे. याच आधारावर अर्ज बाद करण्याची मागणी भाजपने केली होती.
नटराजन यांच्या विरोधात कुठलेच गुन्हेगारी प्रकरण नाही, त्यांना केवळ न्यायालयाकडून नोटीस प्राप्त झाली होती, याचमुळे प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख करण्याचे कुठलेच दायित्व नव्हते असे काँग्रेसचे सांगणे आहे.
मध्यप्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची जागा हडपण्यासाठी भाजप राजकारणाच्या सर्व मर्यादा तोडू पाहत आहे. पूर्वी काँग्रेस आमदारांना घेऊन जाणाऱ्या विमानाल कथित स्वरुपात दीर्घकाळापर्यंत उ•ाण करण्यास अनुमती देण्यात आली नाही. तर आता नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने आक्षेप नेंदविण्यात आला, तसेच विधानसभा परिसरात भाजप नेत्यांकडून गोंधळ घालण्यात आला, परंतु काँग्रेस भाजपच्या या कृत्यांमुळे घाबरून जाणार नाही. लोकशाहीवादी मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस पूर्ण मजबुतीने उभा असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.
आमदार कर्नाटकात
राज्यसभा निवडणुकीवरून स्वत:च्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसने विशेष विमानाद्वारे त्यांना कर्नाटकात पाठविण्याची रणनीति आखली होती. बहुतांश आमदार बेंगळूरमध्ये पोहोचणार होते. परंतु नटराजन यांचा अर्जच बाद ठरल्यावर पक्षाची ही रणनीति देखील चर्चेचा विषय ठरली आहे.
भाजपचा होणार विजय
मध्यप्रदेशातील राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपने तरुण चुघ, रजनीश अग्रवाल आणि महेश केवट यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्याने आता तिन्ही जागांवर भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वाढली आहे.
Comments are closed.