Congress claims post of Leader of Opposition in the Legislative Council


अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. त्यामुळे मविआच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारपासून (ता. 03 मार्च) सुरुवात झाली आहे. महायुती सरकारचे विधानसभा निवडणुकीनंतर हे दुसरे अधिवेशन आहे. महायुतीच्या काळात पहिले हिवाळी अधिवेशन पार पडले, परंतु, त्याचा कालावधी अवघ्या आठवडाभराचा होता. तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 मार्चपर्यंत चालणार आहे, ज्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. त्यामुळे मविआच्या गोटात खळबळ उडाली आहे. (Congress claims post of Leader of Opposition in the Legislative Council)

राज्यामध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होऊन 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने भरघोस विजय मिळवून महाविकास आघाडीचे पानिपत केले. तरीही, सरकार स्थापन करण्यासाठी 5 डिसेंबर 2024चा मुहूर्त महायुतीला मिळाला. यावरून विरोधकांकडून महायुतीवर टीकास्त्र सोडले जात असले तरी, महाविकास आघाडीची स्थिती याहून वेगळी नाही. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या. त्यातही समाजवादी पार्टी (2), माकपा (1) आणि एमआयएम (1) यांची साथ ध्यानी घेता, महाविकास आघाडीचे संख्याबळ जवळपास 50 आहे. विरोधी पक्षनेतेपदाची माळ ठाकरे गटाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट आहे. तर याचवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा दावा नाही तर हक्क असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा… Vidhan Parishad : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला निवडणूक

तर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर आमचाच हक्क असल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील आवारातून पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधानसभेत विरोधी पक्षामध्ये शिवसेना ठाकरे गटाची संख्या जास्त आहे. त्यामुळे साहाजिकच त्यांचा विरोधी पक्षनेता बनणार. पण वरच्या सभागृहात म्हणजेच विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता बनणार. कारण तिथे आमच्या काँग्रेसची संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्यांची संख्या जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याबाबत काही वाद करण्यास काही अर्थ नाही. विधिमंडळातील जे नियम असतात, त्यावर सर्व निर्णय होतात, असे पटोलेंकडून सांगण्यात आले.

कोणाचे नाव चर्चेत?

महाविकास आघाडीतील विधानसभा आणि विधान परिषदेसाठीच्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा हा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार आहे. त्यातही सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.



Source link

Comments are closed.