Congress former mla sangram thopate and sanjay jagtap also likely join bjp radhakrishna vikhe patil
पुणे : लोकसभेला उत्तम परफॉर्मन्स दाखविलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित, असं यश प्राप्त झालं नाही. पाच वर्षे केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसल्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे. नाशिकच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकला आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस दोन बडे नेतेही भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी पूर्वीचे काँग्रेसधील आणि भाजपमध्ये जम बसविलेले मंत्री प्रयत्नशील आहेत.
पुरंदर हवेलीचे संजय जगताप आणि भोर-राजगड-मुळशीचे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे माजी आमदार ‘हात’ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजप प्रवेशासाठी चाचपणी सुरू केली आहे. जगताप आणि थोपटे यांना भाजपत घेण्यासाठी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
पुणे जिल्ह्यात जगताप आणि थोपटेंच्या माध्यमातून काँग्रेसचे दोन आमदार 2019 मध्ये निवडून आले होते. तर, कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर, असे काँग्रेसचे तीन आमदार होते. पण, 2024 च्या विधानसभेला तीनही नेत्यांचा पराभव झाला आणि पुण्यातून काँग्रेस सुपडासाफ झाली. आता जर जगताप आणि थोपटे यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकल्यास काँग्रेसची जिल्ह्यातील स्थिती बिकट होऊ शकते. परंतु, जगताप आणि थोपटेंच्या प्रवेशाला भाजपमधील स्थानिक कार्यकर्ते, नेते यांचा विरोध आहे.
हेही वाचा : सैफवर हल्ला झाल्याचं कळताच सुप्रिया सुळेंना बसला धक्का, थेट करिश्मा कपूरला फोन; दोघींमध्ये काय झाला संवाद?
पुणे हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला आहे. जगताप आणि थोपटेंना पराभवाचा सामना करावा लागल्यानं अजितदादांशी दोन हात करणे अवघड जाणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध असला, तरी जगताप आणि थोपटेंना पक्षात घेतल्यास पुण्यात काँग्रेसचा नामोनिशाण मिटू शकतो. तसेच, 2029 मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे अजितदादांना राजकारणात शह देण्यासाठी जगताप आणि थोपटेंचा उपयोग होऊ शकतो. त्यादृष्टीनं दोन्ही नेत्यांना पक्ष घेण्याबाबत भाजपकडून विचारमंथन सुरू आहे.
अजितदादांनी केलेली संग्राम थोपटेंची अडचण…
संग्राम थोपटे यांच्या ताब्यात राजगड सहकारी साखर कारखाना आहे. कारखाना अडचणीत असून वेळोवेळी त्यांनी सरकारकडे मदत मागितली. मदत मिळालेली सुद्धा होती, पण अजितदादांच्या दबावानंतर ती मदत नंतर नाकारण्यात आली. त्यामुळे थोपटे भाजपमध्ये गेल्यास कारखान्यासाठी पाहिजे असलेली मदत मिळून अजितदादांना दोनहात करण्यासाठी ताकद मिळणार आहे. त्यापार्श्वभूमीवर थोपटेंनी आपल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत.
शिवतारेंना आव्हान देण्यासाठी जगतापांना ताकद हवी…
संजय जगताप यांचा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ( शिंदे गट ) विजय शिवतारे यांनी पराभव केला होता. जगतापांसह थोपटेंच्या प्रचारालाही काँग्रेसचे बडे नेते फिरकले नव्हते. आता विधानसभेतील पराभवामुळे जगतापांची राजकीय अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पाच वर्षे शिवतारेंसारख्या बलाढ्य नेत्याला लढत देण्यासाठी भाजपसारख्या पक्षाची गरज जगतापांना आहे. त्यामुळे जगताप आणि थोपटे काय निर्णय घेतात? हे आगामी काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा : पक्ष उद्धव ठाकरे की संजय राऊत चालवतात? ‘त्या’ गोष्टीवरून शिवसेनेचा नेता भडकला
Comments are closed.