काँग्रेसचा बारामतीमध्ये उमेदवार जाहीर, राहुरी शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार

बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने अखेर आज उमेदवार जाहीर केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कॉंग्रेसने धनगर समाजाचा चेहरा असलेले अॅड. आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. राहुरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढणार असून उमेदवाराचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून याव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात सुनेत्रा पवार यांनी आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही फोन केला होता असे सांगण्यात येते. मात्र त्यानंतरही कॉंग्रेसने आज आपला उमेदवार जाहीर केला.

सुनेत्रा पवारांना 19 उमेदवारांचे आव्हान

सुनेत्रा पवार यांच्यासमोर बारामतीमध्ये 19 उमेदवार आहेत. त्यात कॉंग्रेसच्या आकाश मोरे यांच्यासह हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घटुकडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अरुण निटुरे यांच्यासह 15 अपक्षांचा समावेश आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार उतरवला जाणार आहे. अहिल्यानगरच्या राष्ट्रवादी भवनात यासंदर्भात बैठक झाली. भाजपने राहुरीत अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल असे राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले. त्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी भवनातील बैठकीला तनपुरे हे अनुपस्थित होते म्हणून ते अपक्ष उभे राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र तनपुरे यांच्या आपण संपका&त आहोत असे लंके यांनी सांगितले.

राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नाही – शशिकांत शिंदे

अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नाही, अशी अधिकृत घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर यासंदर्भात आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

…तरच माघार ः आकाश मोरे

आकाश मोरे यांनी या उमेदवारीबद्दल बोलताना सांगितले की, आमचा मूळ शत्रू हा भाजपा आणि त्यांची विचारसरणी आहे. भाजपसोबत जे असतील त्यांच्याविरोधात आम्ही लढणारच. अजित पवार विमान दुर्घटनेबद्दल सरकार महाराष्ट्रात एफआयआर दाखल करत असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे.

Comments are closed.